Dwarka Submarine : द्वारकेजवळील समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारकानगरी पहाण्यासाठी गुजरात सरकार पाणबुडी चालवणार !

३०० फूट खाली जाऊन घेता येणार दर्शन !

कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकार द्वारकेपासून काही किमी अंतरावर समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे अवशेष पहाण्यासाठी पाणबुडी चालवणार आहे. ही पाणबुडी ३५ टन वजनाची असेल आणि यामध्ये एका वेळी ३० जण बसू शकतील. ‘माझगाव डॉक शिपयार्ड’ या भारत सरकारच्या आस्थापनासमवेत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे. जानेवारीत होणार्‍या व्यापाराच्या संदर्भातील परिषदेत याची घोषणा केली जाईल.

राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव हरित शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्वदेशी पाणबुडी माझगाव डॉकद्वारे चालवली जाणार आहे. याचा प्रारंभ पुढील वर्षी जन्माष्टमी किंवा दिवाळी पासून होईल. ही पाणबुडी समुद्रात ३०० फूट खाली जाईल. या प्रवासाला दोन ते अडीच घंटे लागतील. याचे भाडे किती असेल ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र यासाठी सरकार अनुदान किंवा अन्य सवलत देऊ शकेल.