गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम
पणजी, २२ डिसेंबर (वार्ता.) : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यातील ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘ध्वनी मॅपिंग, संवेदनशील ठिकाणांची ओळख आणि ध्वनीप्रदूषण अल्प करण्यासाठी इतर सुविधा असलेला एक प्रकल्प चालू केला आहे. १२ मासांचा हा प्रकल्प ‘सी.एस्.आय्.आर्.-सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’, नवी देहली आणि ‘एन्व्हायरोटॅक इन्स्ट्रूमेंट्स प्रा.लि.’ यांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी ८० लाख रुपये अंदाजे खर्च येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी साळगाव येथे झालेल्या एका कार्यशाळेत ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरातील आवाजाच्या पातळीचा अभ्यास केला जाणार आहे आणि १२ मासांचा कालावधी उलटल्यानंतर याचा एक अहवाल सिद्ध केला जाणार आहे. यामध्ये ध्वनीप्रदूषण होणारी संवेदनशील स्थळे आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या संभाव्य उपाययोजना यांची माहिती असणार आहे.’’