‘आम्ही मागील ७ वर्षे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत चेन्नई येथील सेवाकेंद्रामध्ये रहात होतो. आता आम्ही चेन्नई येथील हे सेवाकेंद्र बंद करून ते कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे हालवले आहे. चेन्नई सेवाकेंद्र चैतन्यमय बनले होते. अर्थात् ते तसे बनण्यामागे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याच आहेत. या सेवाकेंद्राविषयी आणि तेथे रहात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे देत आहे.
सेवाकेंद्र म्हटल्यावर आपल्याला ‘किमान २ खोल्यांचे बैठे घर किंवा सदनिका’, असेल’, असे वाटते. प्रत्यक्ष सेवाकेंद्र पाहिले, तेव्हा ते कल्पनेच्याही पलीकडे लहान होते. त्या एवढ्याशा जागेत श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि त्यांच्या समवेत दौर्यावर असणारे आम्ही ४ साधक, असे ५ जण रहाणार होतो. प्रथम माझ्या मनामध्ये विचार आला, ‘एवढ्याशा जागेत कसे सगळे जमणार ? सेवा कशी होणार ?’, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘काही नसण्यापेक्षा देवाने आपल्याला पुष्कळ मोठी जागा दिली आहे. परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या लहान खोलीत राहून ब्रह्मांड चालवत आहेत. देवाने आपल्याला इतकी मोठी जागा दिली आहे. अजून आपल्याला काय हवे आहे ? आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे आपले मन मोठे हवे. मन मोठे असेल, तर आपल्याला जागेचे बंधन रहात नाही.’’
१. ‘मनाची मर्यादा वाढवल्यास कुठेही राहून कुठलेही कार्य करू शकतो’, हे लक्षात येणे
आरंभी मला ‘जागा फार लहान आहे’, असे वाटले; पण प्रत्यक्ष तिथे रहायला लागल्यावर लक्षात आले, ‘जागा कितीही लहान असली, तरी त्या ठिकाणी कार्य करण्याची आणि कार्य होण्याची गती फार अफाट आहे.’ यावरून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे जागेपेक्षा आपण आपल्या मनाची मर्यादा वाढवली, तर आपण कुठेही राहून कुठलेही कार्य करू शकतो’, ही गोष्ट शिकता आली.
२. चेन्नई सेवाकेंद्राच्या जागेचे स्वरूप !
२ अ. बैठककक्ष : चेन्नई सेवाकेंद्रात १२ फूट x १२ फूट आकाराचा एक बैठककक्ष आहे. ‘त्यात ४ फूट x ६ फूट आकाराचे एक मोठे जेवणाचे पटल आहे. त्यामुळे बैठककक्षात जागा किती राहिली असेल’, ते लक्षात येईल.
सेवाकेंद्राचे स्वयंपाघर केवळ ६ फूट x ३ फूट आकाराचे आहे. त्यामुळे एक साधक आत गेला, तर दुसर्याने तो बाहेर येण्याची वाट पहावी लागायची किंवा त्याच ठिकाणी दोघांनीही समन्वय ठेवून सेवा करावी लागायची. इतकी अडचण असूनही गेल्या ७ वर्षांत ‘आम्ही कुणी एकमेकांना कधी धडकलो किंवा वस्तू खाली पडली किंवा धक्का लागून हातातून भाजी किंवा आमटी सांडली’, असे एकदाही झाले नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्वांना ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीमुळे आणि त्यांच्या अस्तित्वानेच सर्व गोष्टी सुरळीत होत होत्या.
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची खोली अत्यंत लहान असूनही त्या त्यात पुष्कळ आनंदी आणि समाधानी असणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची खोली पुष्कळ लहान होती. त्यांच्या १० x १० चौरस फुटांच्या खोलीत ४ x ६ चौरस फुटांचा एक पलंग असल्यावर किती जागा राहिली असेल ?’, याची आपण कल्पना करू शकतो. त्यातच खोलीत २ फूट x २ फूट लांबीरुंदीची २ लहान कपाटे होती; मात्र कपाट उघडण्यासाठी जागा केवळ १ फूट इतकीच रहात होती. त्यामुळे ‘तिथे उभे राहून कपाटाचे दार कसे उघडायचे ?’, असा प्रश्न पडत असे. त्यातही एका वेळी एकाच कपाटाचे दार उघडू शकत होतो. ते दार पूर्ण बंद केल्याविना दुसरे कपाट उघडताच येत नसे. चुकून कधी दोन्ही कपाटांची दारे उघडण्याचा प्रयत्न केला, तर त्यातच अडकून बसायला होत होते; पण असे असूनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या मुखातून ‘ही जागा मला न्यून पडत आहे किंवा मला अडचण येत आहे. दुसरा पर्याय पहा’, असे कधीही ऐकले नाही.
२ इ. बैठककक्षातील श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची बसायची आसंदी थोडीही इकडे-तिकडे सरकली, तर अडचण होऊन त्यांना उठावे लागणे; मात्र त्यांनी कधीच गार्हाणे न करणे : बैठककक्षात एक शीतकपाटही होते. ते मुख्य दारापाशी होते आणि त्याच्याच बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची खोली होती. त्यांच्या खोलीचे दार आणि शीतकपाट यांच्या मध्यावर असलेल्या जागी त्यांची आसंदी ठेवली होती. कधीतरी आसंदी १ – २ इंच जरी शीतकपाटाच्या बाजूला सरकली, तरी शीतकपाटाचे दार उघडता येत नसे आणि खोलीच्या दाराकडे सरकली, तर साधकाला त्यांच्या खोलीत जाता येत नसे. त्यामुळे त्यांना अनेकदा उठून आसंदी सरकवून बसावे लागायचे. त्यांना दिवसभरात अनेक वेळा अशी उठबस करावी लागायची; पण आम्ही त्यांच्या मुखातून एकदाही ‘किती वेळा उठबस करावी लागत आहे’, असे ऐकले नाही; उलट अशा प्रसंगी त्या स्वतःच उठून त्यांची आसंदी सरकवून बसायच्या.
३. चेन्नई सेवाकेंद्राची अनुभवलेली विलक्षणता !
चेन्नई सेवाकेंद्रातील बैठककक्ष पुष्कळ लहान होता. आश्रमासाठी घेतलेले साहित्य आश्रमात पाठवण्यासाठी करायच्या सर्व सेवा आम्ही याच ठिकाणी केल्या. आतापर्यंत ‘आश्रमासाठीच्या सेवा, अनेक दौरे, प्रतिष्ठित पाहुण्यांच्या भेटी’, अशा अनेक सेवा आम्ही येथेच राहून केल्या. ‘खरोखर अवतारी कार्य कसे असते आणि अवतारी कार्याला कसलीच मर्यादा कशी नसते ?’, याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला चेन्नई सेवाकेंद्रामध्ये अनुभवता आली.
३ अ.‘आश्रमासाठी घेतलेल्या साहित्याची अनेक खोकी पुष्कळ मोठी असूनही ती खोकी ठेवायला बैठककक्षात जागा नाही’, असे कधीही न घडणे : अनेक वेळा आश्रमासाठी कधी चित्रीकरणाचे साहित्य, कधी पूजेची भांडी किंवा अशा प्रकारची खरेदी केलेल्या साहित्याची खोकी मोठ्या आकाराची असायची आणि ती संख्येनेही अधिक, म्हणजे कधी ८ ते १२ खोकीही असायची. ती खोकी बाहेर ठेवू शकत नव्हतो; म्हणून आम्ही ती बैठककक्षातील पटलाच्या खाली ठेवायचो. असे असले, तरी ‘आता जागा संपली. आता काही करू शकत नाही’, असे म्हणण्याची वेळ आमच्यावर कधीच आली नाही. कधी कधी असे वाटायचे, ‘हे साहित्य वाढते, तसा या खोलीचा आकार वाढतो कि काय ?’ तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या ‘मन मोठे करा, देव सगळे सांभाळून घेतो’, या वाक्याची क्षणोक्षणी अनुभूती येत असे.
३ आ. चेन्नईच्या सेवाकेंद्रात अनेकदा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटण्यासाठी प्रतिष्ठित पाहुणे येणे; तरीही ‘अडचण होते’, असे कधी मनात न येणे : अनेकदा काही प्रतिष्ठित पाहुणे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटण्यासाठी चेन्नई सेवाकेंद्रात येत असत. एकाच वेळी ३ पाहुणे आले, तर आम्हाला स्वयंपाकघराच्या दारापाशी किंवा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीच्या दारापाशी उभे रहावे लागायचे किंवा लहान मुंडा (बांबूचे बसण्यासाठी केलेले आसंदीसारखे आसन) घेऊन बसावे लागायचे; पण श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळे ‘आम्हाला सतत जुळवून घ्यावे लागत आहे’, असे कधीही वाटले नाही.
३ इ. झोपायला जागा अपुरी असूनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळे कधीच तसे न जाणवणे : रात्री झोपतांना २ साधक पटलाच्या बाजूला असलेल्या जागेत झोपायचे आणि एक साधक शीतकपाटाला डोके लावून पाय पटलाखाली सरकवून झोपायचा आणि १ साधक खोलीत झोपायचा. असे असूनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळे आम्हाला तिथे कधीच कसलीही न्यूनता जाणवली नाही; उलट ‘हे सेवाकेंद्र, म्हणजे ‘राजमहालच आहे’, असेच आम्हा सर्वांना वाटायचे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेल्या ‘मन मोठे हवे, जागा नाही’, या वाक्याचे आम्हाला क्षणोक्षणी स्मरण व्हायचे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आम्हाला ‘कधीच हे सेवाकेंद्र लहान आहे. इथे जागा अपुरी आहे’, असे जाणवूच दिले नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना इतकी अडचण होत असूनही आम्हाला त्यांच्या बोलण्यात किंवा कुठल्याही कृतीमध्ये कधीच तसे जाणवले नाही. त्यामुळेच आम्हालाही तसे कधी जाणवले नाही.
३ ई. केवढाही मोठा दौरा करून आल्यावर आणि समवेत कितीही साहित्य असले, तरी सेवाकेंद्रात आल्यावर १० – १५ मिनिटांत सर्व साहित्य जागेवर ठेवले जाणे : चेन्नई सेवाकेंद्राची जागा अत्यंत लहान असल्यामुळे तिथे प्रत्येक साहित्याची जागा ठरलेली होती आणि ते ते साहित्य लगेचच त्या त्या जागीच ठेवायला लागायचे. श्री गुरुकृपेने तसे होतही होते. आम्ही कितीही मोठे दौरे करून आलो आणि येतांना कितीही साहित्य समवेत आणले असले, तरी गाडी रिकामी केल्यावर १० – १५ मिनिटांमध्ये सर्व साहित्य त्या त्या जागी लावले जाते. कुठलेही साहित्य बाहेर राहिले नाही किंवा ‘आता आत ठेवायला जागा नाही’, असे कधीही झाले नाही. ‘ते सगळे कसे आणि त्या त्या वेळेत होते ?’, याचे आम्हालाच आश्चर्य वाटते. आमच्यासाठी तो एक चमत्कारच असतो.
खरोखर देवाने कार्य करायचे ठरवले, तर त्याला कुठलीही मर्यादा नाही; याउलट आम्ही कार्य करण्याआधीच ‘कसे होणार आणि काय होणार ?’ या विचारांतच अर्धा वेळ वाया घालवतो. यातून ‘अवतारी कार्य कसे चालते ?’, हे या सर्व गोष्टीतून मला शिकता आले. अवताराला जागेची मर्यादा नसते; कारण संपूर्ण ब्रह्मांडच त्याचे आहे.
४. पुढच्या काळात सनातनचे तिन्ही गुरुच सर्वांच्या स्मरणात रहाणार असल्यामुळे त्यांची स्थानेही सर्वांच्या लक्षात रहाणार असणे
आपण रामायण किंवा महाभारत यात ‘राम येथे राहिला होता, श्रीकृष्ण येथे राहिला होता’, असे वाचतो. आपण त्या स्थानी गेल्यावर अपल्या मनात भाव निर्माण होतो आणि आपण म्हणतो, ‘बापरे ! प्रभु श्रीराम इथे राहिले होते किंवा श्रीकृष्ण इथे राहिला होता !’ सनातनचे साधक, अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांच्या मनात सनातनच्या तिन्ही गुरूंविषयी अपार भाव आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला ‘परात्पर गुरु येथे राहिले होते, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ येथे राहिल्या होत्या, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ येथे राहिल्या होत्या’, असे ऐकायला मिळेल. पुढे सनातनचे तीन गुरुच सर्वांच्या स्मरणात रहाणार आहेत आणि त्यामुळे त्यांची स्थानेही सर्वांच्या लक्षात रहाणार आहेत.
५. कृतज्ञता
‘तिन्ही गुरूंच्या कृपेने मला चेन्नई सेवाकेंद्रामध्ये राहून अत्यंत अनमोल क्षण अनुभवण्याची संधी मिळाली आणि जे अनुभवले, ते तोडक्या-मोडक्या शब्दांमध्ये मांडण्याची संधी देऊन माझ्याकडून ते लिहून घेतले’, यासाठी मी तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. स्नेहल मनोहर राऊत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.१२.२०२३)
चेन्नई सेवाकेंद्राविषयी आलेल्या अनुभूती
१. चेन्नईचे सेवाकेंद्र सोडल्यावर चेन्नई सेवाकेंद्रात येणार्या संत आणि साधक यांना मंदिरात आल्याची अनुभूती येणे
महर्षींनी यावर्षी ‘आपत्काळाच्या दृष्टीने आता कांचीपूरम् येथे सेवाकेंद्र नेऊ शकता’, असे आम्हाला सांगितले. त्यानंतर कांचीपूरम् येथे जागा पाहून सेवाकेंद्र तिकडे हालवले. आम्ही चेन्नई येथे रहात असतांना आम्हाला त्या जागेचे महत्त्व कळले नव्हते; पण आम्ही ते सेवाकेंद्र सोडल्यावर तिथे अनेक संत आणि साधक येऊन गेले. त्या सर्वांना एक सुंदर अनुभूती येत असे, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीत प्रवेश केल्यावर आपण देवीच्या गाभार्यात आलो आहोत. देवीच्या गाभार्यात जी स्पंदने आणि सुगंध जाणवतो, तोच येथे जाणवतो.’ अशी अनुभूती आतापर्यंत ५ संत आणि १२ साधक यांना आली आहे.
तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘एवढी लहान जागा असूनही आम्हाला इथे कधीच काही अडचण का वाटली नाही ? कितीही साहित्य आले, तरी सगळे कसे काय व्यवस्थित बसत होते ? या सेवाकेंद्राकडे एक जागा म्हणून पाहिले असते, तर नक्कीच अडचणी वाटल्या असत्या; मात्र श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या अस्तित्वाने सेवाकेंद्राचे मंदिर झाले होते. मंदिर असल्यावर अडचणी कशा येणार ?’
२. चेन्नई सेवाकेंद्राच्या जवळची वस्ती वाढणे
जिथे मंदिर असते, त्याच्या आसपास वस्ती आपोआपच वाढते. अशी किती तरी मंदिरे आहेत, त्याच्या आजूबाजूला नंतर वस्ती निर्माण झाली. मंदिरातील देव त्यांना बोलवत नाही, तर लोक आपण होऊनच तिथे येतात. तसे आम्ही चेन्नई सेवाकेंद्राविषयी अनुभवले. आम्ही येथे रहाण्यास आलो, तेव्हा इकडे विशेष दुकाने किंवा सोयी नव्हत्या; पण हळूहळू येथील वस्ती वाढू लागली. ‘आता इथे मिळत नाही’, अशी एकही वस्तू नाही. आता येथे सर्व प्रकारची दुकाने, भाजी विक्रेते, अधिकोष इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.
– श्री. स्नेहल मनोहर राऊत (४.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |