७ जणांतील ५ जण मृत
धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवीचे प्राचीन मौल्यवान दागिने चोरी केल्याच्या प्रकरणात अंततः ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा आणि महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा या ४ महंतासह मृत पावलेले साहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे, तसेच मंदिरातील अज्ञात अधिकारी-कर्मचारी या ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हे नोंद करण्यात आलेल्या ७ जणांतील ५ जण मृत आहेत. त्यामुळे ‘प्रशासनाकडून मृत लोकांवर गुन्हे नोंदवून काय साध्य होणार आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
१. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानंतर एक सप्ताहाने तुळजापूर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्याची स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली जाणार आहे.
२. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत गुन्हा नोंद करण्याविषयी टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, तसेच उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी ‘तक्रार देऊनही गुन्हा का नोंद होत नाही ?’, अशी विचारणा करत अधिवेशन संपण्यापूर्वी गुन्हा नोंदवण्याविषयी राज्य सरकारला सूचित केले होते.
३. श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागिने आणि अलंकार आहेत. विविध राजे-महाराजे, संस्थानिक, मोगल बादशाह, निजाम, पोर्तुगीज, डच आदींनी देवीला मोठ्या भक्तीभावाने अलंकार अर्पण केले आहेत. भाविकांनी मागील १४ वर्षांत श्रद्धेपोटी देवीचरणी २०७ किलो सोने, तर २ सहस्र ५०० किलो चांदी अर्पण केली आहे. श्री भवानीदेवीच्या समृद्ध खजिन्यावर मंदिरातील महंत, मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच काही सेवादार्यांनी डल्ला मारला असल्याचे जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे.
४. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि अलंकार यांची पडताळणी करण्यासाठी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ जणांची समिती गठीत केली होती. या समितीने जुलै मासात सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार महंतांजवळ असलेले दागिने, सेवेदार, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अधिकार कक्षेत असलेले मौल्यवान प्राचीन अलंकार याची सीसीटीव्ही छायाचित्रकाच्या निगराणीत पडताळणी केली होती.
५. या पडताळणीमध्ये अनेक प्राचीन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे समोर आले आहे, तर काही अलंकार नव्याने त्या ठिकाणी ठेवून शेकडो वर्षे जुने असलेले दागिने गायब करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार संबंधित दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी ८ दिवसांपूर्वी तुळजापूर पोलिसांना दिले होते.
संपादकीय भूमिकामृतांवर आता गुन्हा नोंदवून काय उपयोग ? प्रशासनाने या सर्वच कारवाईला विलंब केला. मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय ! |