पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन ! – नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

गीर्ट विल्डर्स यांनी भारताचे आणि विशेषत: हिंदूंचे मानले आभार !

अ‍ॅम्स्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्समधील सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवलेले उजव्या विचारसरणीचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी जगभरातून त्यांना मिळालेल्या अभिनंदनाच्या संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विल्डर्स यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर संदेश प्रसारित करून सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी भारताचे आणि विशेषत: हिंदूंचे आभार मानले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या इस्लामी देशांत केवळ हिंदु असल्याने ज्यांच्यावर आक्रमण केले जाते, अशा हिंदूंच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन, असे गीर्ट विल्डर्स यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.

गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्समधील उजव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी नेते आहेत. अलीकडेच त्यांनी कुराणवर बंदी घालण्याविषयी, तसेच मुसलमान हे द्वितीय श्रेणीचे नागरिक असल्याविषयी विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. गीर्ट विल्डर्स हे ‘पार्टी फॉर फ्रीडम’चे संस्थापक आहेत. इस्लाम हा डच संस्कृती आणि पाश्‍चात्य मूल्ये यांच्यासाठी धोका असल्याचे वर्णन त्यांनी अनेकदा केले आहे. काही वादग्रस्त विधानांमुळे त्यांना कायदेशीर आव्हानांचाही सामना करावा लागला आहे. मुसलमानांना नेदरलँड्समधून हद्दपार करून तो ‘इस्लाममुक्त’ करण्याचा ते पुरस्कार करतात.

संपादकीय भूमिका 

भारतातील किती हिंदु खासदारांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली आहे ?