कोल्हापूर – ‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’, असा जयजयकार करत भक्तीमय वातावरणात कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचे १६ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाआरती करून प्रस्थान झाले. या पदयात्रेत ५०० स्वामी भक्तांचा समावेश आहे. मार्गशीर्ष आणि दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने ‘श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रे’च्या वतीने गेली ८ वर्षे कोल्हापूर ते अक्कलकोट पायी दिंडीचे आयोजन केले जात आहे.
१६ डिसेंबरला पहाटे ३ वाजता प्रयाग चिखली पंचगंगा नदी संगमावरील दत्त मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांना महाअभिषेक, पूजाअर्चा संकल्प करून पदयात्रेला प्रारंभ झाला. शिवाजी पूल, पंचगंगा घाट येथे दिंडी येताच ढोलताषा, भगवे झेंडे घेतलेले स्वामीभक्त आणि सजवलेले घोडे, स्वामी नामाचा गजर यांमुळे दिंडीतील वातावरण भक्तीमय झाले. ‘ज्ञानोबा तुकाराम आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, तुरंबे’ या बाल भजनी मंडळाचा कलाविष्कार नेत्रांचे पारणे फेडणारा ठरला.
स्वामीभक्त सुहास लटोरे, मेघराज खराडे, प्रसाद वळंजु, नितीन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून दिंडी अक्कलकोटकडे प्रस्थान झाली. या वेळी पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, अध्यक्ष अमोल कोरे, संस्थापक रमेश चावरे, यशवंत चव्हाण, नियोजन समितीचे अध्यक्ष गजानन शिंदे यांच्यासह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.