बनावट वधू-वर सूचक टोळीला पायबंद घालण्यासाठी मनसेचे व्यापक आंदोलन ! – सुनील सामंत

सौ. मनीषा घाटगे, दिशा मांडवकर, सुनील सामंत, संदीप साळोखे, राहुल नाईक

कोल्हापूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक बनावट वधू-वर सूचक मंडळे आणि दलाल तरुण, तसेच त्यांच्या कुटुंबियांना प्रतिदिन फसवत आहेत. तरी खोट्या, बनावट वधू-वर सूचक टोळीला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. यात १९ डिसेंबरला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना भेटून बनावट मंडळांवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. त्याची प्रत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक श्री. सुनील सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सौ. मनीषा घाटगे, दिशा मांडवकर, सुनील सामंत, संदीप साळोखे, राहुल नाईक, महेश कदम, राहुल पाटील उपस्थित होते.

श्री. सुनील सामंत म्हणाले, ‘‘मनसेच्या माध्यमातून बोगस वधू-वर मंडळांवर रितसर कारवाई करण्यात यावी, यासाठी ‘स्टींग ऑपरेशन’ (छुप्या छायाचित्रक संचातून केलेले चित्रण) करण्याची मोहीम हातात घेण्यात येणार आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अल्प असल्याने मुलांना वधू मिळणे कठीण झाले आहे. याचसमवेत मुलांच्या तुलनेत मुलींचे उच्चशिक्षित असण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्यांच्या अपेक्षित ‘स्थळ’ उपलब्ध होत नसल्याने गरजू विवाहइच्छुक मुलांच्या पालकांना हेरून मुलींची खोटी छायाचित्रे आणि माहिती सिद्ध करून पैसे उकळले जात आहेत. याला पायबंद घालण्यासाठी मनसेने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरी आजवर फसवणूक झालेल्या वधू-वर पालकांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात.’’