|
नवी देहली – लोकसभेत घुसखोरी केल्याच्या प्रकरणातील पसार आरोपी ललित झा याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उपस्थित केल्यावर न्यायालयाने त्याला १ आठवडा पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. घटनेच्या वेळी ललित झा संसद परिसराच्या बाहेर उपस्थित होता. त्याने अन्य ४ आरोपींचे भ्रमणभाष स्वतःकडे ठेवले होते.घटनेनंतर तो हे सर्व भ्रमणभाष घेऊन पळून गेला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. पसार झाल्यानंतर ललितने हे सर्व भ्रमाणभाष जाळून पुरावे नष्ट केले आहेत. देहली पोलीस या घटनेच्या चौकशीच्या अंतर्गत ही घटना प्रत्यक्षात कशी घडली ?, याचे दृश्य उभे करण्यासाठी आरोपींना १-२ दिवसांत संसद भवनामध्ये नेणार आहेत.
गुरुग्राममधून अटक करण्यात आलेला आरोपी विशाल शर्मा याने चौकशीत सांगितले की, त्यांचा कुठल्याही आतंकवादी संघटनेशी संबंध नाही. त्यांनी दीड वर्षांपासून संसदेत घुसखोरी करण्याचा कट रचला होता. ललित याला घटनेचे चित्रीकरण फेसबूकवर थेट प्रक्षेपित करायचे होते. आरोपींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पत्रकेही सापडल्याचे देहली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी बनवल्या होत्या २ योजना !
लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी आरोपींनी २ योजना बनवल्या होत्या. जर नियोजन केल्याप्रमाणे पहिली योजना यशस्वी ठरली नाही, तर पर्यायी योजना राबवण्याची त्यांनी सिद्धता ठेवली होती, अशी माहिती ललित झा याने पोलीस चौकशीत दिली. ललित झा याने पोलिसांना सांगितले की, जर ठरल्याप्रमाणे नीलम आणि अमोल संसदेच्या जवळ पोचू शकले नसते, तर महेश आणि कैलाश यांना दुसर्या बाजूने संसदेच्या आवारात पाठवण्याची सिद्धता आम्ही केली होती. तेथून ते ‘कलर स्मोक ट्यूब’ फोडून प्रसारमाध्यमांसमोर घोषणाबाजी करणार होते, अशी दुसरी योजना ठरली होती; पण महेश आणि कैलाश गुरुग्राममधील विकीच्या घरी पोचू शकले नाहीत. त्यामळे आम्ही पहिल्या योजनेप्रमाणे अमोल आणि नीलम यांना संसद परिसरात पाठवण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांनी त्यांचे ठरलेले काम पूर्ण करावे, असे निर्देश त्या दोघांना दिले होते.
संपादकीय भूमिका
|