|
नेवासे (जिल्हा अहिल्यानगर) – गेल्या अनेक वर्षांपासून ज्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांचा निधी संमत होऊन काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली. त्या नेवासे तालुक्यातील सोनईतला महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा असलेला रस्ता चक्क खासगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी उत्तरदायी असलेल्या ग्रामसेवकासह ‘सिटी सर्व्हे’ (नगर सर्वेक्षण) कार्यालयातल्या अधिकार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करा, अशी मागणी सोनईतील संतप्त व्यापारी बांधवांमधून केली जात आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक) विशेष म्हणजे ज्या सोनई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हा ठराव करण्यात आला, त्या ठरावावर सोनईच्या सरपंचाची स्वाक्षरीच नसल्याचे व्यापारी बांधवांनी सांगितले. जोपर्यंत हा वाद मिटणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग उपोषण करण्याची चेतावणी सोनईच्या संतप्त व्यापारी बांधवांनी दिली आहे.
‘व्यापारी बांधवांच्या या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. सरपंच पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाच हा प्रकार माहिती नाही. हे असे राजरोसपणे व्हायला लागले, तर सामान्य माणसाचे काय होणार ?’, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.