‘बेस्ट’च्या स्वमालकीच्या बसचा प्रति १ किलोमीटरमागे १९४ रुपये व्यय ! – मुख्यमंत्री

मासिक व्यय २४० कोटी, तर उत्पन्न केवळ ६० कोटी

एकनाथ शिंदे

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रति १ किलोमीटरमागे १९३.६४ रुपये व्यय होतो. तर भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा व्यय प्रति १ किलोमीटरमागे १२० रुपये होतो. त्यातून ‘बेस्ट’ला प्रति माह १८० कोटी रुपये हानी सहन करावी लागत आहे. त्यामुळे स्वमालकीपेक्षा भाडेतत्त्वावर गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधीवर दिले.

खासगी बस ताफ्यात भरती करूनही बेस्ट उपक्रमाचे उत्पन्न वाढण्याऐवजी सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याचे सूत्र विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करण्यात आले होते.

१. ‘बेस्ट’ उपक्रमाचा मासिक व्यय २४० कोटी रुपये, तर उत्पन्न केवळ ६० कोटी रुपये आहे. १८० कोटी इतकी मासिक हानीची रक्कम मुंबई पालिकेकडून अनुदान म्हणून देण्यात येत आहे.

२. प्रदूषण अल्प करण्याच्या उद्देशाने २ सहस्र १०० एकमजली आणि ९०० दुमजली इलेक्ट्रिक, तसेच २०० एकमजली ‘सी.एन्.जी.’ अशा एकूण ३ सहस्र २०० बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

३. त्यातील ३५ दुमजली आणि ४५ एकमजली अशा एकूण ८० गाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.