मातृभाषेतून शिक्षण प्रभावी – परिसंवादातील मत
रत्नागिरी – वाचन ही काळाची आवश्यकता आहे. वाचाल, तर वाचाल हे खर्या अर्थाने बरोबर आहे. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सुब्रम्हण्य भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. चंद्रकांत सूर्यवंशी पुढे म्हणाले, ‘‘पृथ्वीच्या अस्तित्वापासून अनेक सिद्धांत आहेत. त्याचसमवेत अनेक प्रश्नांची उकलही झालेली नाही. आज सहजपणे मिळालेल्या गोष्टींसाठी पूर्वी पुष्कळ झगडायला लागले आहे. संघर्ष करावा लागला आहे. जनावरांनाही अधिकार आहे, इथपर्यंत प्रगल्भता वाढलेली आहे. २५ वर्षांपुढील जग कसे असेल ? यावर लिहितो, वाचतो. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो. या सर्वांचा पाया पुस्तक आहे. वाचन संस्कृती आणि भाषा वृद्धींगत करण्याचे काम करा.’’
‘मातृभाषेतून शिक्षण प्रभावी – परिसंवादातील सूर’ या निमित्ताने झालेल्या परिसंवादात कोणत्याही मातृभाषेतून घेतलेले शिक्षण प्रभावी ठरते, असे मत विचारवंतांनी मांडले.
मराठी भाषेविषयी प्रा. कदम म्हणाल्या, ‘‘वेस पालटली की, भाषा पालटते. भाषेत भिन्नता असली, तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यांमधून विविध भाषांची गोडी लावता येईल. भाषा शिकणे, हा उत्सव होऊ शकतो. शिक्षण जरी मातृभाषेत असले, तरी इतर भाषांचा सन्मान करायला हवा.
प्रा. डॉ. जाधव म्हणाले, ‘‘५६ बोलीभाषा आणि त्याच्या अनेक उपभाषा अस्तित्वात आहेत, तरीही आपण इंग्रजीच्या आहारी जात आहोत. संस्कृती जपण्याचे काम मातृभाषाच करते.’’
हिंदी भाषेविषयी बोलतांना प्रा. शिंदे म्हणाले, ‘‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. बोलतांना गोडी निर्माण करणारी आहे. आपल्या मनातील भावना समोरच्यापर्यंत पोचवणे, हे भाषा उत्तम काम करते. हिंदी आर्यकुलीन भाषा आहे. संतांची भाषा आहे. विश्वामध्ये १ अरबहून जादा बोलणारे आणि समजणारे यांची ती भाषा आहे.