Kumaraswamy : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार कधीही पडू शकते !

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा दावा !

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार कधीही पडू शकते. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील एक प्रभावशाली मंत्री ५० ते ६० आमदारांसह पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी होऊ शकतो, असा दावा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी केला. कुमारस्वामी यांनी या प्रभावशाली नेत्याचे नाव सांगण्यास नकार दिला.

कुमारस्वामी पुढे म्हणाले की, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक चालेले नाही. हे सरकार कधी पडेल ?, ते ठाऊक नाही. एक प्रभावशाली मंत्री त्याच्यावरील खटले टाळण्यासाठी हतबल झाला आहे. केंद्र सरकारने त्यांच्यावर असे खटले प्रविष्ट केले आहेत, ज्यांत ते वाचण्याची शक्यता नाही. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. सध्या त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा चालू असून पक्ष पालटण्याच्या प्रक्रियेत ते ५० ते ६० आमदारांना समवेत आणू शकतात. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडू शकते, तर कर्नाटकातही ते अशक्य नाही.