‘गेल्या काही वर्षांमध्ये गोव्याची लोकसंख्या वाढतांना ठळकपणे दिसत आहे. अनेक मंडळी अशी आहेत की, जी कैक वर्षांपूर्वी गोवा राज्याच्या बाहेरील राज्यात जन्मली; परंतु त्यांनी नंतर गोवा हीच कर्मभूमी समजून येथे स्थलांतरित होऊन संसार थाटला. ते येथे शिकले, वाढले, या मातीतच त्यांनी देह ठेवला. कित्येक नागरिक असेही आहेत की, ज्यांचा विवाह गोव्याच्या बाहेर झालेला आहे; परंतु त्यांनी येथे राहून संपूर्ण आयुष्य गोव्यात घालवले. त्यांना पुढे येथेच मुले-बाळे झाली. ५०-६० वर्षांपूर्वी असे स्थलांतर होऊन येथे आलेले आणि स्वतःचे संपूर्ण आयुष्य येथे घालवलेले शेकडो लोक गोव्यात आहेत. गोव्यात अनेक वर्षांपासून ‘कॉमन सिव्हिल कोड’ (समान नागरी कायदा) आहे. त्यामुळे येथे जन्मलेल्या, लग्न केलेल्या आणि मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) कार्यालयात नोंद झालेली असते, तसा कायदा येथे अगदी आधीपासून आहे. तसा कायदा भारतातील इतर राज्यांमध्ये नाही.
१. परराज्यांतून गोव्यात कायमचे वास्तव्य करणार्यांकडे जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे होणारी अडचण !
महाराष्ट्र किंवा कर्नाटक घ्या, या शेजारील राज्यांमध्ये अनुमाने ४० वर्षांपूर्वी नोंदणी तेवढी सक्षम नव्हती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जन्म, तसेच लग्न जर त्यांच्या त्यांच्या गावात झालेली असली, तरी त्यांचा जन्मदाखला (बर्थ सर्टिफिकेट) आणि विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) अस्तित्वात नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील काही खेडी, तालुका, वस्ती यांमध्ये जन्मदाखला अन् विवाह प्रमाणपत्र यांची नोंदणी सरकारी कार्यालयामध्ये साधी नोंदणीही होत नसे. जसा काळ पुढे सरकत गेला, तशी तशी नोंदणी करण्यामध्ये सुधारणा होत गेली आणि अशा कुटुंबातील अनेक जण जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत, ते १९८०-९० च्या दशकात गोव्यामध्ये स्थलांतरित झाले आणि येथेच कायमचे रहिवासी म्हणून जगले. याच सर्वांना पुढे गोव्यातच ‘आधारकार्ड’, तसेच ‘मतदानकार्ड’ही देण्यात आले. कायद्याच्या दृष्टीने ते गोव्याचे ‘डोमिसाईल’ (कायमचे वास्तव्य करणारे) आहेत; परंतु कित्येकांकडे जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्रही नाहीत. काही शासकीय योजनांसाठी सरकारी आदेशाप्रमाणे हे २ दाखले आवश्यक ठरतात आणि तेच त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे पुष्कळशा नागरिकांचे येथे अडते.
२. अन्य राज्यांमध्ये जुन्या काळातील जन्म आणि लग्न नोंदी करण्याची पद्धत !
इतर राज्यांमध्ये अजूनही त्यांच्या नोंदणी कार्यालयात नोंदणी (रजिस्टर्ड) न झालेले जन्म आणि लग्न नोंदी करून दिल्या जातात. एक उदाहरण पाहूया. एकाचे लग्न पुण्यात वर्ष १९८० मध्ये झालेले आहे आणि त्या वेळी त्यांनी त्यांची नोंदणी केलेली नव्हती. त्यानंतर वर्ष १९८२ मध्ये ते गोव्यात स्थलांतरित झाले आणि येथेच किंवा पुण्यातच राहिले; परंतु ‘नोंदणी’ केलेली नाही. अशा मंडळींना पुण्याच्या नोंदणी कार्यालयात अशी नोंद करता येते. एका फॉर्मसमवेत दोघांची छायाचित्रे, वयाचा कोणताही पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला), आधारकार्ड, पॅनकार्ड, ‘ॲफिडेव्हिट’ (प्रतिज्ञापत्र), दोन साक्षीदार, जमल्यास लग्नपत्रिका (जुनी) आणि ती नसल्यास त्यासाठी ‘प्रतिज्ञापत्र’ अशी कागदपत्रे सादर केल्यावर ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र’ (मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) मिळते. लग्न झाल्याचे सर्व पुरावे दिले की, त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे ज्येष्ठांची पुष्कळ सोय झालेली आहे. अशाच पद्धतीने जन्मदाखलाही मिळतो. त्यामुळे यांची अडचण दूर होते.
३. गोव्यात परराज्यांतील जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्र देण्यासाठी विभाग चालू करणे आवश्यक !
दुर्दैवाने अशी पद्धत गोव्यातील नोंदणी (रजिस्ट्रार) कार्यालयात नसल्यामुळे इथे रहिवाशांची अडचण होते. ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले-नातवंडे येथे झाली, शिकली, वाढली आणि त्यांच्या सर्व नोंदणी येथे झालेल्या आहेत. अशा नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र येथून मिळण्यास खरे तर काहीच अडचण नसावी; परंतु गोव्यात तशी सोय उपलब्ध नाही. महत्त्वाचे, म्हणजे जे गाव ५०-६० वर्षांपूर्वी सोडले, तेथील कोणतेही पाश त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे तेथे जाऊन परत नोंदणी करणे शक्य नसते; कारण इतर सर्व कागदपत्रांवर गोव्याचा पत्ता असतो. त्यामुळे त्यांची पुष्कळ अडचण होते. ‘पासपोर्ट’ (पारपत्र) काढण्यासाठीही जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्र आवश्यक असते. या अडचणींमुळे त्यांना पारपत्र मिळत नाही.
त्यामुळे सरकारला काही सूचना कराव्याशा वाटतात –
अ. ‘पोस्ट मॅरेज’ (विवाहानंतर नोंदणी) आणि ‘बर्थ रजिस्ट्रेशन’ (जन्म नोंदणी) विभाग चालू करावा.
आ. दांपत्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे पडताळून घ्यावीत.
इ. प्रतिज्ञापत्रावर साक्षांकित (ॲटेस्टेड) लिखाण घ्यावे.
ई. त्यांच्या मुला-बाळांची आवश्यक कागदपत्रे पडताळावीत.
या सर्व कागदपत्रांची खात्री पटली की, त्यांना येथे (गोव्यात) विवाह प्रमाणपत्र प्रदान करावे. भले लग्न बिहारमध्ये झालेले असले, तरी त्याची नोंदणी येथे (गोव्यात) करावी. खरा खरा सर्व तपशील विवाह प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यांवर यावा. यामुळे अनेक गोमंतकीय ज्येष्ठ नागरिकांची पुष्कळ सोय होईल. सरकारने याची नोंद घ्यावी.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.