आतंकवादाला विरोध दर्शवणार्या सर्वच देशांनी ‘हमास’च्या जिहादी कृत्याचा धिक्कार करत इस्रायलच्या गाझामधील आक्रमणाचे समर्थन केले. केरळमध्ये कोझीकोड समुद्र किनार्यावर २३ डिसेंबर या दिवशी काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन केले आहे. त्यात किमान ५० सहस्र लोक जमतील, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला. केरळमधील सत्ताधारी ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)’, समस्त साम्यवादी पक्ष, ‘इंडियन मुस्लीम लीग’ आणि काँग्रेस पक्ष पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अशा या विशाल रॅलीचे आयोजन केले. यातून केरळ हे ‘इस्लामिक स्टेट’चा आदर्श म्हणून प्रस्तावित व्हावा आणि त्याचे पडसाद देशभरात उमटावेत, असा एकूणच प्रयत्न चाललेला दिसतो. त्याचाच या लेखात घेतलेला हा मागोवा…
१. काँग्रेसचे पॅलेस्टाईनला समर्थन केवळ मुसलमानांच्या मतासाठीच !
केरळमध्ये जणू जगण्या-मरण्याचा प्रश्नच आहे, अशा आविभार्वात भाजप सोडून तिथले इतर राजकीय पक्ष पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅली काढण्यात व्यस्त होते. ‘बाटग्याची बांग मोठी’, अशी म्हण आजही सर्रास वापरली जाते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसची आतंकवादाला समर्थन देणारी ही मानसिकता म्हणायला हवी. काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी ते राहुल गांधी आणि सर्वच काँग्रेसी नेत्यांनी ‘इस्रायल-हमास’ संघर्षात पॅलेस्टाईनचे समर्थन केले. अर्थात् काँग्रेस आता काही भारताचा सत्ताधारी पक्ष नाही की, त्याची भूमिका ही आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारात घेतली जाईल; मात्र तरीही भारताच्या राजकारणात काँग्रेसने ही भूमिका केवळ आणि केवळ भारतीय मुसलमान समाजाला गृहीत धरून घेतलेली आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. ‘सगळेच मुसलमान देशापेक्षा त्यांच्या धर्माला आणि धर्मबांधवांना जवळचे मानतात’, अशी एक धारणा आणि दुर्दैवाने ती बहुसंख्यपणे बरोबरही आहेच; पण याच मताला सर्व मुसलमानांची मानसिकता आणि आग्रह समजत केवळ त्यांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी काँग्रेसने पॅलेस्टाईनचे समर्थन केले, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाहीच !
२. केरळमधील ख्रिस्ती समाज काँग्रेसपासून दूर जाण्यामागील कारण
केरळचे राजकारण पहाता स्पष्ट जाणवते की, ‘कम्युनिस्ट पक्षा’चे (मार्क्सवादी) तिथला हिंदु समाज समर्थन करायचा. आता वर्ष २०१४ नंतर हळूहळू का होईना, राज्यातील हिंदूंचे समर्थनही भाजपकडे वळतांना दिसत आहे. काँग्रेसला केरळमध्ये पारंपरिकरित्या ख्रिस्ती समुदायाची मते मिळायची. काँग्रेसशी साथसंगत करणार्या ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ची केरळी मुसलमानांमध्ये चांगली पकड. त्यामुळे हिंदु, मुसलमान आणि ख्रिस्ती मते अशा प्रकारे विभागलेली होती; मात्र ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज (अमली पदार्थ) जिहाद’ यांनी केरळमध्ये वातावरण ढवळून निघाले. केरळच्या सायरो मलबार चर्चचे बिशप जोसेफ कल्लारंगाट यांनी दावा केला की, केरळमधील ख्रिस्ती मुलींना ‘लव्ह आणि नार्कोटिक्स जिहाद’चे शिकार बनवले जात आहे. जिथे शस्त्रे काम करत नाहीत, तेथे आतंकवादी ‘लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’चा वापर करत आहेत अन् अन्य धर्मांची हानी करत आहेत. केरळमधील ख्रिस्ती समाजाने ‘लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’वर वारंवार प्रश्न उपस्थित केले अन् चिंता व्यक्त केली; मात्र त्यांचा आवडता काँग्रेस पक्ष तोंडात मूग गिळून गप्पच बसला.
उलट तत्कालीन केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी.टी. थॉमस यांनी बिशपलाच धारेवर धरले. ते म्हणाले, ‘‘बिशपचे म्हणणे धार्मिक सलोखा बिघडवणारे आहे. आम्हाला माहिती नाही की, कोणत्या आधारावर ते असे बोलले; मात्र काँग्रेस पक्षाला वाटते की, त्यांच्या अशा बोलण्याने सामाजिक एकतेला तडा जात आहे. त्यांना कुणीही समर्थन देऊ नये.’’
ओमन चंडी सोडले, तर केरळमधील कोणत्याही नेत्याने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे केरळमधील ख्रिस्ती समाज काँग्रेसपासून दूर जाऊ लागला. त्याचा परिणाम ख्रिस्ती समाजाची एकगठ्ठा मते मिळवता आली नाहीत; म्हणून मग काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले. दुसरीकडे केरळमधील हिंदु समाजाचे भाजपला समर्थन मिळत आहे. अशा वेळी मतदान वाढवण्यासाठी मुसलमान मतदारांना जाळ्यात ओढणे, हाच पर्याय काँग्रेसकडे उरला. त्यामुळे काँग्रेसने केरळमध्ये पॅलेस्टाईन समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन केले. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, स्वतःला ‘काश्मिरी’ आणि ‘जानवेधारी पंडित’ म्हणवणारे काँग्रेसचे राहुल गांधी केरळमध्ये हिंदुत्वासाठी कधीही बोलतांना दिसत नाहीत. अर्थात् लोकांना मूर्ख बनवणे, ही त्यांची कला आहेच.
३. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हिंदुद्वेष आणि ‘इंडियन मुस्लिम लीग’ची कट्टरता
केरळमध्ये काँग्रेस असो की, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) की, इंडियन युनियन मुस्लिम लीग या तिघांमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची आणि हिंदूंची श्रद्धा दुर्लक्षित करण्याची जणू स्पर्धाच चालू आहे. केरळमध्ये ‘सरस्वती मंडपम्’ आणि ‘नवरात्री मंडपम्’ ही ऐतिहासिक मंदिरे आहेत; मात्र केरळच्या सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) नुकतेच या मंदिराचे त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार्या कार्यालयात रूपांतर केले. याला हिंदूंनी तीव्र विरोध केला. सत्तेच्या बळावर तो विरोध भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मोडून काढला. दुसरीकडे केरळातील मंदिरात रा.स्व. संघाची शाखा आणि त्या संदर्भात काहीही कृती वा विचार करण्यास केरळ प्रशासनाने बंदी आणली आहे, हे विशेष ! देश आणि धर्म निष्ठ यांचे विचार कार्य करण्यासाठी बंदी; पण राजकीय प्रचार करण्यासाठी मंदिरांचा वापर, हे कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे.
‘केरल मॉडेल’साठी पाण्यासारखा पैसा ओतून केरळमधील इस्लामी संस्कृतीचे प्रदर्शन करू इच्छिणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) त्यालाही जाणवत आहे की, केरळमधील त्यांचा पारंपरिक हिंदू मतदार त्यांना ‘टाटा-बाय बाय’ करणार (सोडणार) आहे. केरळचा दुसरा मोठा प्रादेशिक पक्ष ‘इंडियन मुस्लिम लीग.’ पाकिस्तान निर्मिती करणारा मुस्लिम लीग स्वातंत्र्यानंतर कुठे गेला ? तर तो गेला नाही, त्याचा नव्याने पुनर्जन्म झाला, तो म्हणजे ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ हा पक्ष ! या इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युवा शाखेने नुकतीच एक रॅली काढली. त्यात सहस्रो मुसलमान सामील झाले आणि त्यांचे नारे होते, ‘हिंदूंनो, तुम्हाला मंदिरात उलटे लटकवू, तुम्हाला जाळून टाकू, तुमची कबर खणू.’ या अशा पक्षाशी ‘मोहब्बत की दुकान’ उघडणार्या राहुल गांधींनी केरळमध्ये सत्तेत सहभाग घेतला आहे.
४. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
पुन्हा चर्चा करूया केरळमधील काँग्रेसची. काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी अदानी-अंबानी यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात; पण दिव्याखाली नव्हे, पंज्याखालचा अंधार ते बघत नाहीत. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् यांच्यावर मागे गुन्हे नोंदवण्यात आले होते. तीसुद्धा एक अतीरंजक कथाच आहे. केरळच्या कोची कलुरमध्ये मॉनसन मावुंकल नावाचा माणूस ‘ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचा संग्राहक आणि विक्रेता आहे’, असे सांगायचा. तो सांगायचा, ‘‘त्याच्या संग्रहात येशूने परिधान केलेल्या वस्त्राचा तुकडा, जगातील पहिले मुद्रित केलेले बायबल, महंमद पैगंबर यांनी वापरलेला प्याला, त्रावणकोरचा राजा आणि टिपू सुलतान यांचे सिंहासन, सद्दाम हुसेनकडचे कुराण, मुसाची लाठी अन् लिओनार्डो द विंची आणि राजा रवी वर्मा यांनी स्वतः बनवलेले चित्र; इतकेच काय, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेली गीतासुद्धा संग्रही आहे.’’ या मॉनसन मावुंकलवर २४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला. त्याने काही लोकांना सांगितले की, आखाती देशातील राजघराण्यातील २.६२ लाख कोटी रूपयांच्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंसाठी वाटाघाटी चालू आहेत. त्यामुळे ६ जणांनी त्याला १० कोटी रुपये दिले; मात्र मावुंकलने त्यांची फसवणूक केली. या लोकांनी सांगितले की, आम्ही ज्या वेळी मावुंकलला भेटलो, तेव्हा तेथे काँग्रेसचे नेते सुधाकरन् उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आखाती देशातून येणार्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू सोडवण्यासाठी ते देहलीला जाणार आहेत. सुधाकरन्सारखा नेता सांगतो; म्हणून आमचा विश्वास बसला. यामुळे सुधाकरन् यांचीही चौकशी करण्यात आली. त्यात स्पष्ट झाले की, सुधाकरन् आणि मावुंकल अनेक वेळा भेटले होते अन् दोघांची एकत्रितरित्या अनेक छायाचित्रेही उपलब्ध होती; मात्र पुराव्यांअभावी पुढे सुधाकरन् यांच्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. इतकेच काय, तर मावुंकल याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हाही सिद्ध झाला. ही मुलगी त्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. या मुलीने चौकशीत सांगितले की, मावुंकल बलात्कार करत होता, त्या वेळी सुधाकरन् तेथे उपस्थित होते; मात्र या आरोपालाही पुराव्यांअभावी बळ मिळाले नाही. असे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष !
५. राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांचे लांगूलचालनाचे खरे स्वरूप !
काँग्रेसच्या हिंदुविरोधी राजकारणाचे उत्तम उदाहरण, म्हणजे रिजील चंद्रन मक्कुटी. तोच रिजील ज्याने पंतप्रधान मोदींनी गायीच्या मांसावर निर्बंध लादले; म्हणून वर्ष २०१७ मध्ये गायीच्या वासराची सर्वांसमक्ष हत्या केली होती. त्याने अत्यंत निर्दयीपणे त्या लहान वासराला फरफटत आणले आणि सार्वजनिक स्थळी क्रूरपणे वासराची हत्या केली. त्यामुळे केरळमधीलच नव्हे, तर देशभरातील मुसलमान आणि ख्रिस्ती आनंदी होतील, असे रिजीलला वाटल; मात्र त्याच्या या क्रूरतेचा देशभरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर मग राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर संदेश दिला, ‘जे झाले ते वाईट होते, असे कृत्य निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष याचे समर्थन करत नाही.’ काँग्रेस पक्षाने त्याचे निलंबन करण्याची तत्परताही दाखवली; पण राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा जेव्हा जेव्हा केरळात जायचे, तेव्हा तेव्हा रिजीलला भेटायचे. रिजील त्यांच्या भेटीची छायाचित्रेही समाजमाध्यमांवर प्रसारित करायचा. इतकेच काय, राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या वेळीही रिजीलची भेट घेतलीच. आता तर काय रिजील हा केरळमधील युवा काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. याचाच अर्थ देशभरातील हिंदूंना भुलवण्यासाठी समाजमाध्यमांवर रिजीलचा निषेध; पण केरळमधील इतर धर्मियांच्या लांगूलचालनासाठी रिजीलला समर्थन. वा रे काँग्रेस !
६. सौदी अरेबियात पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यासाठी घेतली जाणारी भूमिका अन् काँग्रेसचे इस्लामप्रेम
सध्या केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), समस्त साम्यवादी पक्ष, इंडियन मुस्लिम लीग आणि काँग्रेस पक्ष पॅलेस्टाईनच्या आडून मुसलमानांचे तुष्टीकरण करतांना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जगभरातील इस्लामी देशातील सामर्थ्यशाली देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये काय घडले ? इसलाह अब्दूर रहमान हा ब्रिटीश कलाकार नुकताच सौदी अरेबियामधील मक्केला गेला होता; मात्र त्याला तेथे ४ सैनिकांनी अटक केली. त्याची कसून चौकशी केली. चौकशी करतांना ते सैनिक अरबी भाषेत सारखे ‘स्कार्फ’, ‘पॅलेस्टाईन’, ‘हमास’ वगैरे शब्द वापरत होते. अनेक घंट्यांच्या चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. त्यापूर्वी त्याला सांगण्यात आले, ‘मक्का हे पवित्र स्थळ आहे. येथे प्रार्थना होते. पॅलेस्टाईन-इस्रायल करू नकोस. ते चांगले नाही.’
इसलाहने हा अनुभव कथन करत म्हटले, ‘पॅलेस्टाईनच्या ध्वजासारखा स्कार्फ हाताभोवती गुंडाळला होता. त्यामुळे त्यांना वाटले की, मी पॅलेस्टाईन समर्थक आहे.’ केवळ इसलाहलाच नाही, तर मक्का-मदिना येथे पॅलेस्टाईन समर्थनार्थ प्रार्थना करण्यापूर्वीच अनेकांना सौदी अरेबिया प्रशासनाने अटक केली आहे. सौदी अरेबिया म्हणजे जगभरातील इस्लामी आणि मुसलमानांसाठी अल्लाचा आशीर्वाद असलेला देश ! आपल्या भारतातील गल्लीबोळातही काही लोक सौदी अरेबियाला ‘हमारे नबी का देश’ असे म्हणतात, तर अशा या नबीच्या देशातच ‘मुस्लिम बद्ररहूड’नुसार पॅलेस्टाईनसाठी सामुदायिकरित्या सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास मोकळीक नाही. नव्हे सौदी अरेबियाच्या भूमीवर परक्या पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यासाठी का जमायचे ?, अशी तिथे भूमिका घेतली जाते; मात्र राहुल गांधी यांचे ‘मोहब्बतचे दुकान’ केरळमध्ये उघडपणे पॅलेस्टाईनचे समर्थन करत इस्रायलवर ‘हमास’ने केलेल्या क्रूर आक्रमणाचे जणू समर्थनच करत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे केरळमधील ‘मोहब्बतचे दुकान’ हे असे चालू आहे !
– योगिता साळवी
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या बाजूचे असल्याचे भासवून हिंदूंची दिशाभूल करणार्या काँग्रेसपासून हिंदूंनी नेहमी सावध रहाणे आवश्यक ! |