कारगिल : एक संहारक यशोगाथा !

काल, २६ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ झाला. त्या निमित्ताने…

इतिहासात असे काही क्षण येतात जे केवळ युद्धाच्या रणभूमीवरच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या स्मरणात कायमचे कोरले जातात. अशाच एका थरारक, रोमांचक आणि असामान्य शौर्यगाथेने भरलेल्या पर्वाचे नाव आहे ‘कारगिल युद्ध’ ! हे केवळ शस्त्रांनी लढलेले युद्ध नव्हते, तर ती होती एक महायात्रा शौर्याची, त्यागाची, प्रेरणेची आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची ! हाडे गोठवणार्‍या थंडीमध्ये, प्रचंड उंचीवर, विरळ हवामानात आणि अशक्य वाटणार्‍या भूप्रदेशात २ मास ३ आठवडे आणि २ दिवस जगातील सर्वांत उंचीवरच्या भूमीत कारगिलचे युद्ध लढले गेले. ३ मे ते २६ जुलै हा तो कालावधी. या युद्धातील प्रत्येक दिवसाच्या स्मृती लष्कराकडून जागवल्या जात आहेत. युद्धभूमी ते आजचे कारगिल यात पुष्कळ तफावत आहे.

१. पाकची कारगिलमधील घुसखोरी, त्याने केलेली पूर्वसिद्धता आणि ‘जीनिव्हा करारा’चे उल्लंघन

ऑक्टोबर १९९८ मध्ये दोन वरिष्ठांना डावलून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना ‘सरसेनापती’ पद बहाल केले होते. मुशर्रफ आणि ‘आय.एस्.आय.’ (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना) यांच्या दृष्टीने काश्मीर प्रश्न प्रज्वलित राहणे आवश्यक होते. काश्मीर खोर्‍यातील ‘आय.एस्.आय.’च्या कारवायांना भारतीय सुरक्षा दलांनी लगाम घातल्याने एका नवीन भागात कुरापत काढण्यासाठी पाककडून कारगिलची निवड करण्यात आली होती. त्या भागात घुसखोरी केल्याने पाकचे २ उद्देश साध्य होणार होते. एक म्हणजे काश्मीरचा प्रश्न नव्याने धुमसणार होता आणि दुसरे म्हणजे कारगिलमधील घुसखोरीमुळे सियाचीनचा प्रश्न सोडवण्यास साहाय्य होणार होते.

ऑक्टोबर १९९८ ते मार्च १९९९ या कालावधीत पाककडून घुसखोरीची सर्व सिद्धता करण्यात आली. त्यात सीमारेषेपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती केली, खेचरांसाठी पायवाटा बनवल्या. विविध अत्याधुनिक बंकर्स उभे करून त्यांच्यात जड शस्त्रास्त्रे, दारूगोळा, खाण्यापिण्याचे पदार्थ, बर्फातील बूट इत्यादींचा साठा करण्यात आला. दूरभाष यंत्रणा विकसित करण्यात आली. ताबारेषेच्या अगदी जवळच अनुमाने

८ ते १० हेलिपॅड बनवण्यात आले. पाकने जानेवारी आणि फेब्रुवारी १९९९ च्या प्रारंभीला प्रथम निरीक्षण पथके (रेकी पार्टी) पाठवली. त्यानंतर पाकिस्तान ‘नॉर्थ लाईट इन्फन्ट्री’च्या पलटणीच्या तुकड्यांनी मार्च केले. रसद, दारूगोळा आणि हत्यारे पुढे आणली गेली. विविध डोंगरमाथ्यांची आणि पठारांची निवड करून त्यांवर बंकर्स उभारण्यात आली. त्यात ५० ते ५५ पाकिस्तानी सैनिकांच्या तुकड्या राखीव करण्यात आल्या. मशीनगन, रॉकेट लाँचर, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर, मोर्टर, विमानविरोधी तोफा आणि विमानांवर अचूक मारा करणारी अत्याधुनिक प्रक्षेपणास्त्रे ठेवण्यात आली. भूसुरुंग पेरण्यात आले. वर्ष १९९८-१९९९चा हिवाळा सौम्य असल्यामुळे हे काम सुकर झाले. ‘काश्मीर स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने पेटलेल्या काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांची ही कामगिरी आहे’, असे भासवण्यासाठी ‘नॉर्थ लाईट इन्फन्ट्री’च्या सैनिकांना सलवार कमीजचा पेहराव दिला गेला. वास्तविक जीनिव्हा करार आणि सैनिकीमूल्ये यांचे हे उल्लंघन होते.

२. मेंढपाळांनी पाकचे सैन्य घुसल्याची बातमी भारतीय सैन्याला देणे

श्री. योगेश चकोर

वर्ष १९९८-१९९९च्या सौम्य हिवाळ्यामुळे एका बाजूस पाकिस्तानची घुसखोरी सुकर झाली, तर दुसर्‍या बाजूस नैसर्गिक पालटानुसार जूनमध्ये बर्फ वितळण्यास चालू होण्याऐवजी मेमध्येच तो वितळला. याची वाट पहात असलेल्या येथील मेंढपाळांना काकसर आणि बटालिक यांमधील डोंगरदर्‍यांत पाकिस्तानी सैनिक मोर्चे बांधत असलेले दिसले. ४ मे या दिवशी मेंढपाळांकडून ही बातमी मिळाल्यावर भारतीय सैन्याची चक्रे वेगाने फिरू लागली. काश्मीर खोर्‍यातच बंडखोरांविरुद्ध कार्यरत असलेल्या ‘८ माऊंटन डिव्हिजन’ला तातडीने कारगिल विभागात हलण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि क्रमाक्रमाने २१ मे १९९९ पर्यंत पूर्ण तुकडी तेथे पोचली. या घुसखोरीविषयी भारतीय संरक्षण मंत्रालयाने २५ मे या दिवशी देहली येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.

३. वाजपेयी सरकारने आखलेली रणनीती

पाकिस्तानी मोर्चे मोक्याच्या जागांवर उभारलेले आणि परिपूर्ण होते. उभे सरळ डोंगरी कडा, दुर्गम पाऊलवाटा, ७ सहस्र फूट शत्रूच्या दृष्टीखाली चढून जातांना होणारी दमछाक, अंगावर जड कपडे, पाठीवर शस्त्र, दारूगोळा आणि खाण्याच्या सामानाचे अवजड वजन हे सगळे पेलत दुर्गम पर्वतराजींच्या शिखरांवर ठाण मांडून बसलेल्या पाक सैन्यावर आक्रमण करणे अन् घुसखोरांना ताबारेषेमागे हाकलणे, ही खडतर कामगिरी होती. भारतासमोर मुख्यतः २ पर्याय होते. पहिला म्हणजे ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरा म्हणजे काश्मीरमध्ये वा इतरत्र आक्रमणाकरवी पाकिस्तानी प्रदेश काबीज करून कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकला भाग पाडणे. भारताने आता ताबारेषा ओलांडणे, म्हणजे पाकिस्तानी खोडसाळपणाचे समर्थन करण्याजोगे होते. निर्णय घेण्याचे दायित्व तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारवर होते. सर्व बाजूंचा सारासार विचार करून पंतप्रधान वाजपेयींनी पहिला पर्याय निवडला. एका बाजूला ताबारेषा न ओलांडण्याच्या नैतिक निर्णयाकरवी आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवायचा आणि पाकवर घुसखोरी मागे घेण्यासाठी दबाव आणायचा. दुसर्‍या बाजूला लष्करी बळ पणाला लावून पाकच्या घुसखोरीचा धुव्वा उडवायचा. ही द्विस्तरीय रणनीती अवलंबण्याचे वाजपेयींनी ठरवले. यात प्राणहानीची जोखीम होती; परंतु भारतीय सैन्यावर पंतप्रधानांचा दृढ विश्वास होता. या नीतीचा भारताने परिणामकारक पाठपुरावा केला.

४. भारतीय सैन्याने विजयासाठी केलेली पराकाष्ठा

पाकिस्तानी मोर्चाबंदीचे प्रामुख्याने २ विभाग होते. पहिला द्रास-मश्को विभाग आणि दुसरा बटालिक विभाग. तब्बल २० दिवस शत्रूने भारतीय तुकड्यांना पुढे येऊ दिले नाही. ११ आणि १२ जून या दिवशी बोफोर्स तोफा उघड्यावर आणून त्यातून बरबाद बंकरवर थेट मारा करण्यात आला. हे एक निर्णायक वळण होते. नेम धरून येणारा गोळीबार खंडित झाल्यावर २ ‘राजपुताना रायफल्स’, ‘जम्मू-काश्मीर रायफल्स’ आणि ‘१८ गढवाल’ या पलटणींनी ३ वेगवेगळ्या दिशांनी ‘पॉईंट ५१४०’वर एकाच वेळी आक्रमण करून ते सर केले. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी दाखवलेला पराक्रम आणि नेतृत्वासाठी त्यांना ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले. त्यानंतर ‘१८ गढवाल’ने खंबीर झुंज देऊन ‘पॉईंट ४७००’वर ताबा मिळवला. त्याच्या पाडावानंतर ‘टायगर हिल’ या शत्रूच्या सर्वांत कणखर ठाण्यावर ‘१८ ग्रिनेडिअर’ आणि ‘८ शीख’ या दोन पलटणींनी आक्रमण केले अन् रोमांचकारी लढतीनंतर ते सर केले. या लढाईत ‘ग्रिनेडिअर’च्या योगेंद्रसिंग यादव या सैनिकाला ‘परमवीर चक्रा’ने गौरवण्यात आले. ‘टायगर हिल’ हा पाकिस्तानचा सर्वांत महत्त्वाचा बालेकिल्ला होता. तो कोसळल्यानंतर मुशर्रफांचे धाबे दणाणले. त्यानंतर ‘पॉईंट ४८७५’वर पुन्हा ‘१३ जम्मू-काश्मीर रायफल्स’, ‘१७ जाट’ आणि ‘२ नागा’ या पलटणींनी आक्रमण केले. एका घनघोर चकमकीनंतर ते बंकर्स भारतीय लष्कराच्या हातात आले. त्याच कालावधीत कॅप्टन विक्रम बत्रा धारातिर्थी पडले. ‘१३ जम्मू-काश्मीर रायफल्स’चा रायफलमन संजयकुमार यांना त्यांच्या अचाट पराक्रमासाठी ‘परमवीर चक्रा’ने सन्मानित करण्यात आले.

बटालिक विभागात ‘१ बिहार’ने जुब्बार ठाण्यावर आक्रमण केले; पण ते यशस्वी झाले नाही. शेवटी अनेक अथक प्रयत्नांनंतर तब्बल १ मासांनंतर ७ जुलैला ते बंकर्स त्यांच्या हातात आले. यासह खालुबार डोंगरसरीवरील बंकरवर ‘१/११ गोरखा रायफल्स (१/११ जी.आर्.)’ आणि ‘१२ जम्मू-काश्मीर रायफल्स लाईट इन्फन्ट्री (जॅक एल्.आय.)’ या २ पलटणींनी २५ मेपासून आक्रमणे चालू केली होती.  ७ जुलैपर्यंत सर्व बंकर्स त्यांच्या हातात आली. खालुबारवरील २-३ जुलैच्या रात्री ‘१/११ गोरखा रायफल्स’चे लेफ्टनंट मनोज पांडे यांच्या उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना ‘मरणोत्तर परमवीर चक्र’ हा सर्वोच्च सैनिकी सन्मान प्रदान करण्यात आला.

उंच डोंगरांच्या कडेकपारीतील मोर्चांवर लढाऊ विमाने चालवणे कठीण होते. तरीही या घटकांना न जुमानता हवाई दलाचा वापर करायचा लक्षणीय निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आणि २६ मे या दिवशी प्रथमच हवाई दलाची विमाने कारगिलच्या आसमंतात अवतरली. त्यानंतर ‘मिग २१ बिझ’, ‘मिग २३ बी.एन्.’, ‘मिग २७ एम्’, ‘मिग २९ बी’ आणि शेवटी ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांनी, तसेच ‘एम्.आय.१७’ हेलिकॉप्टर्स  यांनी जवळजवळ ३४०० उड्डाणे करून पाक घुसखोरांच्या नाकीनऊ आणले. यात भारताने २ ‘मिग २७’ आणि १ ‘एम्.आय.१७’  हेलिकॉप्टर गमावले. मर्यादित युद्धात हवाई दलाचा नियंत्रित स्वरूपात उपयोग हा एक अभूतपूर्व आणि अनोखा प्रयोग होता. हवाई दलाने त्यांच्या अलौकिक कामगिरीने विलक्षण प्रभाव पाडला.

५. …अखेर कारगिल युद्धात पाकच्या पराभवावर शिक्कामोर्तब !

पाकिस्तानला पराभवाची चिन्हे दिसू लागताच नवाज शरीफ यांनी भारतीय पंतप्रधानांना बोलणी करण्यासाठी भेटण्याची विनंती केली. घुसखोरी मागे घेतल्याविना बोलण्यास साफ नकार मिळाल्यावर त्यांनी ३० जूनला चीनकडे धाव घेतली; पण चीनच्या तत्कालीन पंतप्रधानांनी ताबारेषेला मान देऊन या संघर्षाची सांगता करण्याचा सल्ला त्यांना दिला. शेवटी ४ जुलैला टायगर हिलचा बालेकिल्ला पडल्यावर शरीफ यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्याकडे धाव घेतली. वॉशिंग्टनमध्ये चर्चेच्या पश्चात पाक सैन्याला कोणत्याही अटीविना ताबारेषेच्या मागे घेण्याचे त्यांनी मान्य केले. ११ जुलै १९९९ या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी कारवायांचे महासंचालक (डी.जी.एम्.ओ.) पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने १६ जुलैपर्यंत आपल्या सर्व घुसखोरांना परत बोलावण्याची शाश्वती दिली. याच दिवशी कारगिल युद्धात पाकच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले आणि भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा अजरामर झाली.

हा लेखनप्रपंच, म्हणजे केवळ एका युद्धाची कहाणी नाही, तर असंख्य विरांच्या शौर्यगाथेची साक्ष आहे, जी आपल्याला स्मरण करून देते की, देशासाठी प्राण अर्पण करणार्‍यांमुळेच आज आपण स्वातंत्र्याचा, शांततेचा आणि सुरक्षिततेचा श्वास घेता येतो. कारगिल विजय, म्हणजे केवळ युद्ध नाही, तर धैर्य, समर्पण आणि मातृभूमीवरील प्रेम यांचे प्रतीक आहे.

जय हिंद ! वन्दे मातरम् !

लेखक : श्री. योगेश अशोक चकोर, शिक्षक तथा राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी, भोंसला मिलिटरी स्कूल, नाशिक. (२४.७.२०२६)