Goa Fake Beneficiaries Griha Aadhaar Yojana : एक वर्ष उलटूनही गृहआधार योजनेच्या बनावट लाभार्थींकडून कोट्यवधी रुपयांची वसुली झाली नाही !

पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) : एक वर्ष होऊनही गृहआधार योजनेचा अनधिकृतपणे लाभ घेणार्‍या २ सहस्र ९६० लाभार्थींकडून त्यांना वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची अद्याप वसुली झालेली नाही.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

राज्य सरकार गृहआधार योजनेच्या अंतर्गत गृहिणींना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये आर्थिक साहाय्य देते. यासाठी वार्षिक ३ लाख रुपयांची आयमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. पती सरकारी कर्मचारी असतांनाही ३ सहस्रांहून अधिक महिलांनी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेतला. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर महिला आणि बाल विकास खात्याने सुमारे ८९ जणांकडून सुमारे ६४ लाख रुपये वसूल करून घेतले.

महिला आणि बाल विकास खात्याच्या संचालिका संगीता परब

महिला आणि बाल विकास खात्याच्या संचालिका संगीता परब म्हणाल्या, ‘‘गेल्या २ वर्षांपासून ‘गृह आधार’च्या बनावट लाभार्थींकडून वसुली करण्याचा प्रकार चालू आहे. १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ८९ लाभार्थींकडून वसुली झालेली आहे, तर अन्य २ सहस्र ९६० जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.’’ सध्या खात्याकडे ३ सहस्र ९२१ जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत. पात्रता निकष सिद्ध झाल्यानंतरच नवीन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे खात्याचे म्हणणे आहे. योजनेचा अपलाभ घेतला जाऊ नये, यासाठी आधारकार्डसह अर्ज स्वीकारणे, अर्जदार लाभार्थींच्या घरी जाऊन माहिती गोळा करणे आदी उपाययोजना खात्याने केल्या आहेत.