शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदू ! – भाग १७

‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्‍या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्‍या जन्महिंदूंकडून आहे. याविषयी २६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जन्महिंदू असल्याने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती-मुसलमान यांना भारत आणि इथले धर्म त्यांचे वाटत नाहीत, घुसखोर धर्मांधांना आश्रय देणार्‍या देशांनी भयंकर परिणाम भोगणे, भारतात घुसखोरांसाठी पायघड्या घालणारे आणि इस्लामी देशांतून जीव वाचवून आलेल्या हिंदूंना नागरिकत्व देण्यास मात्र विरोध करणारे जन्महिंदू अन् लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर आदींविषयीच्या कायद्यांना विरोध करणारे जन्महिंदू’, यांविषयी वाचले. आज आपण या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

श्री. शंकर गो. पांडे

८. नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याविषयी अभिनेत्याला दिलगिरी व्यक्त करावयास लावणारे जन्महिंदू !

डॉ. अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये साकार केल्या म्हणून डॉ. अमोल कोल्हे प्रसिद्ध पावले. या प्रसिद्धीमुळे त्यांच्या पदरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदारकी पडली ! या मालिकांच्या प्रदर्शनानंतर त्यांनी पूर्वीच नथुराम गोडसे यांची भूमिका केलेला ‘मी गांधीना का मारले ?’ (‘व्हाय आय किल्ड गांधी ?’) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातही त्यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका दमदारपणे साकारली; मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचा भडीमार चालू झाला. जन्महिंदू यामध्ये आघाडीवर होते. शेवटी या टीकेला उत्तर देतांना डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘मी गोडसेची भूमिका एक कलाकार म्हणून साकार केली. कोणती भूमिका करायची याचे स्वातंत्र्य कलाकाराला असले पाहिजे. मालिका किंवा चित्रपट यातून कलाकाराने व्यक्त केलेले मत हे त्याचे वैयक्तिक मत असतेच असे नाही. मी गोडसेची भूमिका केली म्हणून त्यांचे विचार मला मान्य आहेत, असे होत नाही. शिवाय त्या वेळेस मी खासदारही नव्हतो. खासदार झाल्यानंतरही कलाकार म्हणून माझी भूमिका वेगळी राहू शकते आणि एका पक्षाचा खासदार म्हणून माझी भूमिका वेगळी राहू शकते’’; पण जन्महिंदूंना त्यांचे हे स्पष्टीकरण मान्य झाले नाही. अखेर डॉ. अमोल कोल्हे यांना नथुराम गोडसेची भूमिका साकार केल्याविषयी जन्महिंदूंजवळ दिलगिरी व्यक्त करावी लागली आणि माझ्याकडे काम नसल्यामुळे पैशासाठी हे काम मला स्वीकारावे लागले, अशी स्वीकृती द्यावी लागली.

९. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर मुद्दामहून गदारोळ माजवून विधानसभेत त्यांचे भाषण बंद पाडणारे जन्महिंदू !

डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाकारणारे जन्महिंदू मात्र मुसलमानांचे धर्मांध नेते आणि मौलवी हिंदूंच्या कत्तलीची, गजवा-ए-हिंदची, जे.एन्.यू.मध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशी देशद्रोही भाषा बोलतात, तेव्हा मात्र चूप बसतात. छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलतांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते, ‘‘प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व आहे. या देशात अनेक राजे-महाराजे आणि चक्रवर्ती सम्राट होऊन गेले; पण चाणक्य नसते, तर चंद्रगुप्ताला कुणी विचारले असते ? समर्थ रामदास नसते, तर शिवाजी महाराजांना कोण विचारणार ?’’ या विधानामागे चंद्रगुप्त किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांना न्यून लेखण्याचा कोश्यारी यांचा मुळीच हेतू नव्हता; कारण ते स्वतः शिवभक्त आहेत. राज्यपाल असतांना आणि वयोवृद्ध असतांनाही ते शिवरायांचे गडकिल्ले पायी चढून गेले होते. त्यांच्या विधानामागे प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात गुरूंचे किती महत्त्व असते, हेच सांगण्याचा प्रांजळ हेतू होता; पण त्यांच्या या विधानावर जन्महिंदूंनी एकच गदारोळ माजवला. ठिकठिकाणी राज्यपालांविरुद्ध निदर्शने करण्यात आली. विधानसभेत आपल्याच सरकारची भूमिका मांडणार्‍या राज्यपालांचे भाषण बंद पाडले. शेवटी राज्यपालांना त्यांचे भाषण अर्धवट सोडून सभागृहातून बाहेर जावे लागले. लोकशाही राज्यप्रणालीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सत्ताधारी पक्षाने आजवर केलेल्या कामाचा आणि भविष्यात करण्यात येणार्‍या कामाचा आढावा घेणारे, राज्याचे संवैधानिक प्रमुख असणार्‍या राज्यपालांचे भाषण सत्ताधार्‍यांनीच बंद पाडण्याचा लांच्छनास्पद प्रकार कधीच घडला नव्हता; पण जन्महिंदूंनी तो प्रकार केला आणि इतिहासात त्याची काळ्या अक्षराने नोंद झाली.

१०. छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या अलौकीक गुरु-शिष्य नात्याचे वास्तव नाकारणारे जन्महिंदू !

समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज

मुळात समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही संबंध होते, हा इतिहासच अपघाताने हिंदू म्हणून जन्मलेल्या जन्महिंदूंना मान्य नाही. समर्थ आणि शिवराय यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे अन् आत्मियतेचे होते, याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. शिवरायांनी समर्थांना आपल्या गुरुस्थानी मानले होते, दोघांचेही कार्य परस्परांच्या कार्याशी पूरक होते, हे वास्तव जन्महिंदूंना मान्य नाही.

११. इतिहासाच्या घोर विकृतीकरणाचे वैषम्यही नसणारी  आणि ‘आम्ही म्हणू तोच खरा इतिहास’, असे ठरवणारी जन्महिंदूंची झुंडशाही !

हिंदूंच्या द्वेषापायी या जन्महिंदूंनी समर्थांवर नाही नाही ते घाणेरडे आरोप करण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. याचाच अपलाभ मुसलमानांनी उचलला नसता तर नवलच. त्यांनी कुणा बाबा याकुत या मुसलमान मौलवीला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु बनवून टाकले आणि तशा प्रकारचे फलकही मुंबईच्या काही भागात प्रदर्शित केले; पण अपघाताने हिंदू म्हणून जन्मलेल्या जन्महिंदूंचा अशा फलकावर काही आक्षेपही नाही आणि इतिहासाच्या या घोर विकृतीकरणाचे वैषम्यही नाही ! आजकाल झुंडशाही इतकी वाढली आहे की, ऐतिहासिक लेखी कागदपत्रावरून, पुराव्यावरून कुणी इतिहास सांगू अथवा लिहू पहात असेल, तर तो हिंदुविरोधकांना मान्य होत नाही. ‘आम्ही म्हणू तोच खरा इतिहास’, असे या हिंदूविरोधी झुंडशाहीचे म्हणणे असते.

१२. हिंदवी स्वराज्यासाठी शेकडो ब्राह्मणांनी बलीदान केले असतांना जातीयवादासाठी २ गद्दार ब्राह्मणांची उदाहरणे वारंवार देणारे जन्महिंदू !

अफझलखानवधाच्या वेळेस छत्रपती शिवरायांना मारावयास तलवार घेऊन धावणारे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि छत्रपती संभाजी महाराजांना पदच्युत करण्याच्या कारस्थानात सहभागी झालेले अनाजीपंत या दोन ब्राह्मणांचा खलनायक म्हणून जन्महिंदूंकडून वारंवार उल्लेख केला जातो. अर्थात् हे दोघेही खलनायक होतेच. या दोघांनाही त्यांच्या कर्माचे फळ मिळाले. याविषयी कोणत्याही ब्राह्मणाला दुःख नाही; पण केवळ या २ गद्दार ब्राह्मणांची नावे पुढे करून सर्वच ब्राह्मणांना सतत झोडपणे कितपत योग्य आहे ? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी स्वत:च्या प्राणांचेही बलीदान केलेल्या शेकडो ब्राह्मणांचीही नावे सांगता येतील; पण जन्महिंदू ती नावे कधी सांगत नाहीत; कारण त्यांना जातीजातीत फूट पाडायची असते !

१३. अनेक मराठ्यांनी गद्दारी केली असूनही खरे हिंदू कधीही त्या जातीला दूषणे देत नाहीत !

हिंदूंच्या जाज्वल्य इतिहासाचे जेवढे विकृतीकरण करता येईल, तेवढे करायचे असते. तशी तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध लढणार्‍या बाजी घोरपडे, मंबांजी भोसले, राजाजी घाटगे, पिलाजी मोहिते, चंद्रराव मोरे, खंडोजी खोपडे, शंभूराजांना औरंगजेबाच्या हवाली करणारा त्यांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्के, वाईची देशमुखी मिळवण्यासाठी रायगडाचे दरवाजे उघडून देत येसुराणी आणि शाहू यांना औरंगजेबाच्या कह्यात देणारा सूर्याजी पिसाळ अशा पाचपन्नास गद्दारांची नावे सांगता येतील; पण यावरून संपूर्ण एका जातीला गद्दार ठरवण्याचे पाप खरा हिंदु कधी करत नाही !

१४. बाहेरच्या शत्रूपेक्षा अधिक घातक असणारे घरातील फितूर जन्महिंदूंचे पितळ उघडे पाडणे, हेच खरे देश कार्य आणि धर्म कार्य !

भारतातील काही राजकीय पक्षानांही हिंदूंच्या विविध जाती, पंथ-संप्रदाय यांमध्ये फूट पाडून सत्ता बळकावयाची असते. हिंदुत्वनिष्ठ हिंदूंना आपल्या देश आणि धर्म यांचे खरे शत्रू कोण आहेत ? याची पुरेपूर कल्पना अन् जाणीव आहे; म्हणून त्यांना जातीभेद मान्य नाहीत. ‘सर्वे हिन्दव: सोदरा: ।’ म्हणजे ‘सर्व हिंदू (भारत मातेचे पुत्र असल्यामुळे) सख्खे भाऊ आहेत, असे तो मानतो. जाती, पंथ, संप्रदाय, राजकीय विचारसरणी विसरून हिंदु, बौद्ध, जैन, शीख यांची अभेद्य एकी हिंदुत्वनिष्ठ हिंदूंना अभिप्रेत आहे. अशी एकी झाली, तरच आपले राष्ट्र समृद्ध, शक्तीशाली, आत्मनिर्भर होऊन विश्वगुरुपदी विराजमान होणार आहे. अपघाताने हिंदू म्हणून जन्मलेल्या आणि परकीय विचार अन् धनावर पोसल्या जाणार्‍या जन्महिंदूंना हेच नको आहे. भारत शतशः खंडित व्हावा, हिंदु आणि हिंदु धर्म नामशेष व्हावा, हा देश मुसलमान आणि ख्रिस्ती बहुल व्हावा, ही त्यांची मनस्वी मनीषा आहे. बाहेरच्या शत्रूपेक्षा हे घरातील फितूर असलेले जन्महिंदू अधिक घातक आहेत; म्हणून अशा हिंदूंचे पितळ उघड पाडणे, हेच खरे देश आणि धर्म कार्य आहे !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जि. यवतमाळ.