नाशिक – नाशिकरोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या दुकानांसमोर घोषणा देत आंदोलन केले. यात प्रतीकात्मक इंग्रजी फलकांच्या छायाचित्राला काळे फासण्यात आले. ‘८ दिवसांत मराठी भाषेत पाट्या न केल्यास इंग्रजी पाट्यांच्या फलकांना काळे फासण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. या वेळी मनसेचे शहर संघटक तथा अधिवक्ता नितीन पंडित, कार्यकर्ते प्रमोद साखरे, शशी चौधरी, नितीन धानापुणे, विनायक पगारे, मयूर कुकडे आदी उपस्थित होते. अधिवक्ता नितीन पंडित म्हणाले की, न्यायालयाने २ मासांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते. मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती.