पुणे आर्.टी.ओ.तील दलालाकडून ६ जणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक !
पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करून देण्याचे आमीष दाखवून दलालाने ६ जणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी युवराज टकले यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिसांनी मिलिंद भोकरे या दलालाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. टकले यांनी प्रवासी वाहतूक करणार्या मोटारीचा खासगी वापर करण्यासाठी आर्.टी.ओ. कार्यालयात अर्ज दिला होता. ‘आर्.टी.ओ. कार्यालयातील सर्व प्रक्रिया करून देतो’, असे सांगून भोकरेने टकले यांच्याकडून १ लाख ४५ सहस्र रुपये घेतले. त्यांच्याकडून वाहनाची कागदपत्रेही घेतली; परंतु त्यांचे काम न करता पैसे देण्यास टाळाटाळ केली. याविषयी टकले यांनी पोलिसांत तक्रार दिली, तसेच पोलीस चौकशीमध्ये इतर ५ जणांची ७ लाख ४३ सहस्र रुपयांची फसवणूक केली आहे. (राजरोजपणे फसवणूक करणारे दलाल आर्.टी.ओ.मध्ये असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)