जिल्हा न्यायाधिशांकडून खंत व्यक्त !
पुणे – धनादेश न वटल्याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नाही. इतर गुन्ह्यांतील आरोपींना समन्स आणि वॉरंट बजावण्याचीही कार्यवाही प्रभावीपणे होत नाही. न्यायालयात अटकपूर्व आणि नियमित जामीन अर्जांच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित न रहाता तपासी अधिकारी केवळ अहवाल सादर करत आहेत, अशी खंत व्यक्त करत जिल्हा न्यायाधिशांनी पुणे पोलिसांना सुनावले आहे.
जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश, तसेच पुणे शहर पोलिसांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत न्यायालयाने पोलिसांकडून होणार्या दिरंगाईवर बोट ठेवले. या बैठकीचे वृत्त सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले आहे. ‘५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक काळ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्याविषयी समन्स आणि वॉरंट यांची प्रभावीपणे कार्यवाही करून अहवाल न्यायालयास वेळेत सादर करण्याची सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे.’ (अशा सूचना का द्याव्या लागतात ? पोलिसांना स्वतःहून असा निर्णय घ्यावा, असे का वाटत नाही ? – संपादक) वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी याची गंभीर नोंद घेतली आहे.
संपादकीय भूमिकान्यायाधिशांना खंत व्यक्त करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! आतातरी पोलीस प्रशासन यावर विचार करून कर्तव्यनिष्ठ पोलीस सिद्ध करण्याकडे लक्ष देईल का ? |