नम्र अन् साधकांना साधनेत साहाय्य करणारे चि. विनय कुमार आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. वृषाली कुंभार !

कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे चि. विनय कुमार आणि चि.सौ.कां. वृषाली कुंभार यांचा शुभविवाह होत आहे. त्या निमित्त रामनाथी आश्रमातील त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. विनय कुमार
चि.सौ.कां. वृषाली कुंभार

चि. विनय कुमार आणि चि.सौ.कां. वृषाली कुंभार यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

चि. विनय कुमार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. श्री. अभिजित विभूते

अ. ‘विनयदादा प्रत्येक प्रसंगात स्थिर, शांत आणि आनंदी असतात.

आ. साधनेत किंवा वैयक्तिक जीवनात अडचणी आल्यास दादा संतांचे मार्गदर्शन घेतात आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून अडचणींवर मात करतात.’

‘जाणूनी श्रींचे मनोगत’, या भावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करणारे श्री. विनय कुमार ! : ‘विनयदादा चित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करतात. सेवा करतांना बर्‍याचदा त्यांना गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन होते, तसेच त्यांच्या सत्संगाचा लाभ होतो. त्या वेळी स्वतः चित्रीकरण करत असतांनाही दादांचे लक्ष ‘गुरुदेवांना काही हवे का ?’, याकडे असते. साधकांशी बोलत असतांना गुरुदेवांच्या घशाला कोरड पडायची. तेव्हा दादा गुरुदेवांसाठी पाणी आणून देत असत. त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘अरे, तुला कसे कळते, मला पाणी पाहिजे ते !’’

– श्री. अभिजित विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०२३) ०

चि. विनय कुमार आणि चि.सौ.कां. वृषाली कुंभार यांची खर्‍या अर्थाने आध्यात्मिक जोडी असल्याचे जाणवणे : ‘वृषालीताई आणि विनयदादा यांच्या विवाहाचा दिनांक जवळ येऊनही ते दोघे आपापली सेवा करत आहेत. ‘ते स्थिर आणि अंतर्मुख आहेत’, असे मला जाणवते. ‘त्या दोघांची साधना योग्य प्रकारे चालू असून खर्‍या अर्थाने ही आध्यात्मिक जोडी आहे’, असे मला वाटते.’ – श्री. अभिजित विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०२३) ०

२. श्री. चेतन एम्.एन्.

२ अ. नम्रता : ‘विनयदादा त्यांच्या नावाप्रमाणेच सर्व वयोगटातील साधकांशी विनम्रतेने बोलतात. त्यामुळे त्यांची सर्वांशी लवकर जवळीक होते.

२ आ. साधकांना साधनेत साहाय्य करणे

२ आ १. साधनेतील अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करणे : मी विनयदादांच्या खोलीत रहातो. आम्ही दोघेही साधनेतील अडचणींविषयी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतो. दादा मला माझ्या साधनेत येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी साहाय्य करतात.

२ आ २. साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे : मी कधी मनाने खचून गेलो, तर ते वेळ देऊन माझ्याशी बोलतात. त्यामुळे मला आधार मिळून पुन्हा साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ‘मी गुरुसेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, यासंदर्भात दिशा देऊन ते तशी सेवा माझ्याकडून करून घेतात.

२ आ ३. साधनावृद्धीसाठी साहाय्य करणे : विनयदादा मला ‘झोकून देऊन सेवा करण्यासाठी भाव कसा वाढवायचा ? नम्रता कशी वाढवायची ? साधकांशी कसे वागायचे ?’, हे सांगतात. त्यांच्या भावपूर्ण बोलण्याने मलाही गुरूंबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटते.

२ इ. गुरुसेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे : मी विनयदादांना गेल्या २० वर्षांपासून ओळखतो. काही सेवा करतांना त्यांची शारीरिक क्षमता न्यून पडत असतांनाही ते स्वतःची पर्वा न करता गुरुसेवेत मग्न होऊन प्रसंगी रात्रभर जागरण करून गुरुसेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची ती तळमळ आणि भाव पाहून मला त्यांच्यासारखी गुरुसेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळते अन् माझा उत्साहही वाढतो. दादा प्रत्येक सेवा करतांना ती अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न करतात.’

३. श्री. अतुल बधाले

३ अ. ‘दादा सेवेत पूर्वी झालेल्या चुकांचा अभ्यास करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करतात.

३ आ. प्रवासातील वेळ साधना आणि सेवा चांगली होण्यासाठी उपयोगात आणणे : आम्हाला बर्‍याच वेळा चित्रीकरणाच्या सेवेसाठी बाहेरगावी जावे लागते. दादा ‘प्रवासात बर्‍याच वेळा साधनेविषयी बोलणे, सेवेत झालेल्या चुका सांगणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न अन् चिंतन करणे’, असे प्रयत्न करतात. पुढील सेवा करतांना ‘सर्व साधकांना पूर्वी झालेल्या चुकांची जाणीव करून देऊन त्यांना येणार्‍या अडचणी सोडवणे’, हे ते स्वतःहून करतात.

३ इ. सेवेनिमित्त बाहेरगावी गेल्यावर तेथील साधकांशी मिळूनमिसळून वागणे : बाहेरगावी चित्रीकरणाच्या सेवेसाठी गेल्यावर स्थानिक साधकांच्या घरी आमची निवास व्यवस्था असते. त्या वेळी दादा घरातील सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. ते साधकांच्या घरातील सदस्यांशी आपणहून बोलतात. आपण गुरूंच्या आश्रमातून आलो आहोत, तर ‘गुरूंचे चैतन्य सर्वांना मिळावे’, या भावाने ते आश्रमातील खाऊ सर्वांसाठी घेऊन जातात.’

४. सर्वश्री मेहुल राऊत, केदार नाईक, अनिमिष नाफडे आणि दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे)

अ. ‘दादा सर्व सेवा पुढाकार घेऊन आणि झोकून देऊन करतात.

आ. दादा तांत्रिक पद्धतीची सेवा स्वतः शिकून घेऊन तिचा अभ्यास करतात आणि ती इतरांना शिकवतात. ‘सातत्याने नवीन गोष्टींचा अभ्यास करून त्यांचा सेवेसाठी उपयोग कसा करता येईल ?’, हे ते पहातात.’

चि.सौ.कां. वृषाली कुंभार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. कु. भार्गवी सीमित सरमळकर (वय ११ वर्षे) : ‘वृषालीताईचा स्वभाव शांत आहे. तिच्यात ‘निर्मळता, भाव, दुसर्‍यांना साहाय्य करणे’, असे अनेक गुण आहेत.’

२. सौ. तन्वी सीमित सरमळकर

२ अ. ‘वृषालीताईला साधे रहायला आवडते.

२ आ. तत्त्वनिष्ठ : एखाद्या साधकाला चुकांची जाणीव करून देतांना ती ‘परम पूज्यांना काय अपेक्षित आहे ?’, याचा विचार करते. चुका सांगतांना ती भावनाशील होत नाही.

२ इ. भावपूर्ण सेवा करणे : एकदा तिच्याकडे फुलांशी संबंधित सेवा होती. ताई फुलांना अगदी हळूवारपणे हाताळत होती. ताई ही सेवा ‘प्रत्येक फूल गुरुचरणी अर्पण व्हावे’, या भावाने करत होती.

२ ई. गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : तिचे लग्न ठरले आहे. लग्नाची सिद्धता करतांना ‘ती अन्यांच्या लग्नाची सिद्धता करत आहे’, असे वाटते. समाजात लग्न ठरलेल्या मुली एका वेगळ्याच विश्वात असतात; परंतु ताईकडे पाहून तसे जाणवत नाही. ‘ती गुरुमाऊलींच्या अनुसंधानात आहे’, असे वाटते.

२ उ. अनुभूती : कधी कधी मला तिच्या कपाळावरील कुंकवामधून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवून ते तेजस्वी दिसते.’

३. सौ. कीर्ती प्रतीक जाधव

३ अ. प्रांजळपणा : ‘वृषालीकडून कधी व्यष्टी साधनेचे प्रयत्न झाले नसतील, तर ती तसे व्यष्टी साधनेच्या आढाव्यात (टीप) प्रांजळपणे सांगते.

टीप – ‘साधक करत असलेला नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयत्न, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, या सूत्रांविषयी जाणून घेणे आणि त्या संदर्भात साधकांना दिशा देणे

३ आ. शांत आणि स्थिर : वृषाली स्थिर राहून आणि शांतपणे सेवा करते. सेवेशी संबंधित साधकांशी बोलतांनाही तिच्या बोलण्यात स्थिरता आणि शांतपणा जाणवतो.

३ इ. नियोजनबद्ध सेवा करणे : वृषाली कुठलीही सेवा करतांना ती नीट समजून घेते आणि त्यातील बारकावे शिकून घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे संतांच्या सेवेचे दायित्व आहे. ती स्थिर राहून आणि नियोजन करून साधकांकडून संतांची सेवा करून घेते. ‘तिच्या सेवेत घाई-गडबड किंवा गोंधळ झाला आहे’, असे कधी जाणवत नाही.’

४. सौ. स्वाती संदीप शिंदे

४ अ. इतरांना प्रेमाने साहाय्य करणे : ‘कुणी रुग्णाईत असेल किंवा कुणी प्रवासाला जाणार असेल आणि त्यांच्यासाठी एखादा पदार्थ बनवायचा असेल, तर पहिली आठवण वृषालीची येते. आपण तिला हक्काने ही सेवा सांगू शकतो. ती पुष्कळ प्रेमाने स्वतःहून पदार्थ बनवून देते. तो पदार्थ अधिक चांगला करण्यासाठी ती प्रयत्न करते.

४ आ. उत्तम निरीक्षणक्षमता : ती एखाद्या प्रसंगातील साधकाचा स्वभावदोष किंवा अहं यांच्या मुळाशी सहजतेने जाते. त्यामुळे ‘साधकांना स्वतःचे कुठे चुकले ?’, हे लक्षात येऊन ते अंतर्मुख होतात.

४ इ. तिची कुठल्याही सेवेत आवड-नावड नसते.’

५. श्री. पुंडलिक माळी, सौ. विमल माळी, कु. कुशावर्ता माळी आणि कु. संध्या माळी

५ अ. तत्त्वनिष्ठ : ‘वृषालीताई प्रतिदिन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणार्‍या साधकांचा आढावा घेण्याची सेवा करते. आम्हाला त्या आढाव्याला बसण्याची आणि तिचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली आहे. ती तत्त्वनिष्ठ राहून आढावा घेते. त्यामुळे तिने सांगितलेले सूत्र साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोचते आणि साधकांना स्वतःच्या स्वभावदोषांवर लक्ष ठेवायला साहाय्य होते.

५ आ. अनुभूती : वृषालीताई आढावा घेत असतांना ‘प्रत्यक्ष कृष्णच आपल्या समोर बसला आहे आणि तोच साधकांना घडवण्यासाठी एवढे कष्ट घेत आहे’, असे आम्हाला जाणवते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.११.२०२३)