दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
पणजी, २५ नोव्हेंबर (वार्ता.) : पारपत्र कार्यालयानुसार पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केल्यानंतर त्याचे भारतीय नागरिकत्व रहित होत असते. यामुळे लिस्बन, पोर्तुगाल येथे जन्मनोंदणी केलेल्या सहस्रो गोमंतकियांचा दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पारपत्र विभागीय कार्यालयानुसार मागील एक वर्षात आतापर्यंत पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या ७० गोमंतकियांचे भारतीय पारपत्र रहित झालेले आहे. संबंधितांनी भारतीय पारपत्र नूतनीकरण (रिनिव्हल) किंवा जमा (सरेंडर) करतांना हे घडलेले आहे. पारपत्र विभागीय कार्यालयाने दुहेरी नागरिकत्व विषयावरून कारवाई करण्यास प्रारंभ केला असल्याने भारतीय नागरिकत्व रहित होण्याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पारपत्र विभागीय कार्यालयात प्रतिदिन पारपत्राचे नूतनीकरण किंवा ते जमा करण्यासाठी २० अर्ज येतात आणि यांपैकी १ भारतीय पारपत्र रहित होत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी काढलेल्या एका परिपत्रकानंतर दुहेरी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय पारपत्र रहित केले जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील अनेकांनी पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केलेली आहे आणि यामधील काहींनी याविषयी माहिती भारतातील अधिकार्यांना दिलेली नाही आणि हे अनधिकृत आहे. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय पारपत्र कायम ठेवणे, हे नागरिकत्व कायद्यानुसार अनधिकृत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्यांचे भारतीय नागरिकत्व रहित करण्यासाठी पोर्तुगीज प्रशासनाकडे समन्वय करत आहे. गोव्यातील काही राजकारण्यांनीही पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेले असल्याने वर्ष २०१७ पासून हा विषय संवेदनशील बनला आहे.