Anti-Drone System : तुये (गोवा) येथे ‘काउंटर-ड्रोन’ कारखाना येणार

५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ८०० नोकर्‍या निर्माण होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

(काउंटर-ड्रोन म्हणजे ड्रोनविरोधी यंत्रणा)

ड्रोनविरोधी यंत्रणा

पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) : ‘झेन टेक्नॉलॉजीज् लि.’ हे लष्करी प्रशिक्षण आणि काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान निर्मितीमधील एक प्रमुख आस्थापन आहे. आस्थापनाने अत्याधुनिक संशोधन आणि विकास, तसेच उत्पादन विस्तार यांसाठी नवीन धोरणात्मक विस्ताराची घोषणा केली आहे. तुये येथे या आस्थापनाचा प्रकल्प आणि प्रशिक्षण केंद्र येणार आहे. याविषयी माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘तुये येथे येणार्‍या ‘झेन टेक्नॉलॉजीज् लि.’च्या प्रकल्पामध्ये ५० कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पात ८०० नोकर्‍या निर्माण होणार आहेत. गोवा सरकारने तुये येथील ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ येथे हा कारखाना उभारण्यासाठी आस्थापनाशी सामंजस्य करार केला आहे.’’

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सरकारने ‘झेन टेक्नॉलॉजीज् लि.’ला प्रकल्प उभारण्यासाठी भूमी दिली आहे. या ठिकाणी मुख्यत्वे अभियांत्रिकी पदवी, पदविका आणि ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालू होणार आहे. गोव्यातील तरुण या ठिकाणी नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. हे आस्थापन उत्पादनाची निर्यातही करते. २ वर्षांच्या कालावधीत येथे प्रत्यक्ष उत्पादनही चालू होणार आहे.’’