केरळमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा
कोळीकोड (केरळ) – येथे २३ नोव्हेंबर या दिवशी केरळ राज्यातील काँग्रेस पक्षाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार के.सी. वेणुगोपाल आणि शशी थरूर सहभागी झाले होते. या वेळी वेणुगोपाल म्हणाले की, स्वातंत्र्यापासून काँग्रेस सरकारने इस्रायलच्या आक्रमणाला नेहमीच विरोध केला आहे. पॅलेस्टाईनच्या भूमीसाठीच्या लढ्याला आम्ही नेहमीच पाठिंबा दिला; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आल्यानंतर सरकारने भूमिका पालटली.
के.सी. वेणुगोपाल पुढे म्हणाले की,
१. पश्चिम आशियामध्ये चालू असलेले युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये विविध देशांनी ठराव मांडला होता. या ठरावाच्या मतदानाच्या वेळी भारत अनुपस्थित राहिला. हे योग्य नव्हते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जनतेचा अवमान झाला आहे.
२. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू एकसारखेच आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप त्याचे परराष्ट्र धोरण जनसंपर्क म्हणून वापरत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिका‘पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलला विरोध’ हे काँग्रेसचे नेहमीचेच धोरण असून यामागे मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हेच एकमेव कारण आहे, हे जगजाहीर आहे. काँग्रेसला उतरती कळा लागली असतांनाही तिला हे उमगत नाही, हे तिचे दुर्दैव नि देशाचे सुदैव, हे मात्र खरे ! |