स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरासाठी ‘रस्ता बंद आंदोलन’ : प्रवाशांचे हाल !

कोल्हापूर – गतवेळच्या हंगामातील थकीत ४०० रुपये आणि यंदा प्रतिटनासाठी ३ सहस्र ५०० रुपयांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर ‘रस्ता बंद आंदोलन’ चालू केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील वाहतूक कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूरमार्गे वळवण्यात आली होती. या आंदोलनामुळे अचानक काही गाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक प्रवासी काही बसस्थानकांवर अडकून पडले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१. आंदोलनाच्या धास्तीमुळे कर्नाटक राज्याने कोल्हापूरकडे येणारी बस वाहतूक बंद केली होती. महाराष्ट्रातून ज्या बसगाड्या कर्नाटकात गेल्या, तसेच केवळ तिकडून येणार्‍या गाड्याच प्रवाशांना उपलब्ध होत्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

२. कोल्हापूर बसस्थानकाने कोल्हापूर-पुणे, तसेच अन्य काही मार्ग काही काळासाठी बंद ठेवले होते.

३. या संदर्भात राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शरिरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकर्‍यांसाठी लढत रहाणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच कह्यात घेतले आहे, तरीही आमचे आंदोलन झालेच. जोपर्यंत साखर कारखानदार या संदर्भात कोणताही निर्णय घोषित करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू, तसेच सरकार आणि कारखानदार यांना गुडघे टेकायला लावू.’’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे एस्.टी.ने कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-इचलकरंजी, तसेच अन्य अनेक मार्ग बंद ठेवले होते. आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने ५ किलोमीटरपेक्षा अधिक मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची चर्चा चालू होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेच्या अंती रस्ता बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.