१. डिसेंबर मासात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होणार्या शिबिरासाठी जायचे असणे आणि ‘वर्षअखेर असल्यामुळे सुटी मिळेल का ?’, असे वाटणे अन् गुरुकृपेने सहजतेने सुटी मिळणे
‘२० ते २३.१२.२०२० या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर होणार होते. मला आस्थापनातून वर्षअखेरीस सुटी तीसुद्धा १५ दिवस मिळणे अशक्यच होते; मात्र कोणतीही अडचण न येता मला सुटी मिळाली. त्यामुळे मला रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जाणे शक्य झाले. ‘श्री गुरूंची कृपा असेल आणि ईश्वरी नियोजन असेल, तर श्री गुरु आपल्याला जवळ बोलावतात’, ही मोठीच अनुभूती मला आली.
२. प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद केल्यावर ‘सर्व शिबिरार्थी आकाशात असून परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व शिबिरार्थींना आशीर्वाद देत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे
शिबिर चालू झाल्यावर आम्हाला प्रार्थना करायला सांगितली. मी प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद केल्यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व शिबिरार्थी आसंदीवर न बसता आकाशात बसले आहेत आणि समोरून पांढरे अन् फिकट लाल या रंगांचे ढग जात आहेत. आम्ही सर्व शिबिरार्थी उभे राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार करत आहोत आणि ते आम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहेत.’
३. शिबिरातील भाववृद्धी प्रयोगाच्या सत्रात परात्पर गुरु डॉ. आठवले विशाल रूपात दिसणे आणि ‘त्यांनी संपूर्ण रामनाथी आश्रम त्यांच्या कवेत घेतला आहे’, असे दिसणे
शिबिराच्या एका सत्रात कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २३ वर्षे) भाववृद्धीचा प्रयोग करून घेत होत्या. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी विशाल रूप धारण केले आहे. त्यांनी प्रेमाने दोन्ही हातांनी संपूर्ण रामनाथी आश्रम कवेत घेतला आहे. ते वैष्णवीताईंच्या शेजारी उभे राहून ‘भाववृद्धीचे प्रयत्न आणि सर्वकाही योग्य प्रकारे चालले आहे’, असे सांगत आहेत. ते ताईला आणि आम्हा सर्व शिबिरार्थींना आशीर्वाद देत आहेत.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप पुष्कळ विशाल होणे आणि त्यांचे केवळ चरणच दिसणे
नंतर परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप आणखी विशाल झाले. ते पुष्कळ उंचीवरून आम्हाला पहात आहेत आणि आम्ही सर्व शिबिरार्थी त्यांच्यासमोर अगदी लहान दिसत होतो.’ शेवटी तर मला परात्पर गुरु डॉक्टरांचे केवळ चरणच दिसत होते.’
– श्री. संतोष चंदुरकर, दौंड, पुणे. (७.१.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |