|
मुंबई, २० नोव्हेंबर (वार्ता.) – भूकंप, भूस्खलन, पूर, वादळ, आग आदी वारंवार उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तींमध्ये आपत्ती निवारण पथकासह शासकीय कर्मचारी आणि राज्यातील नागरिक यांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठीचा आराखडा शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सिद्ध करण्यात येत आहे. वर्ष २०२४ पासून हे प्रशिक्षण चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकार्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
राज्य ते ग्राम पातळीपर्यंत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याविषयी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना राज्यशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार प्रशिक्षण देण्याचा आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास स्वत:सह सहकार्यांना वाचवता यावे, तसेच मालमत्तेची हानी टाळता यावी, यांविषयी हे प्रशिक्षण असणार आहे. गावपातळीवर प्रथम ग्रामसेवकांना याविषयी प्रशिक्षित करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती या अधिकार्यांनी दिली. काही मासांपूर्वी झालेल्या पावसात रायगड येथील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. या वेळी आपत्ती निवारण पथकाला स्थानिक नागरिकांनीही साहाय्य केले. दुर्घटनास्थळी प्रथम साहाय्य स्थानिकांकडून केले जाते. त्यांना प्रशिक्षित केल्यास दुर्घटनेच्या काळात आपत्ती निवारणाचे कार्य वेगाने होऊ शकेल.
आपत्ती निवारणाचे साहित्यही उपलब्ध करून देणार !
प्रशिक्षणासह आपत्तीच्या काळात लागणारी विजेरी, दोरखंड, शिरस्त्राण आदी सर्व प्रकारच्या आवश्यक साहित्याची सूची सिद्ध करण्यात येत आहे. हे साहित्य शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.