कोकण रेल्वेमध्ये पदवीधर उमेदवारांची होणार भरती
रत्नागिरी – कोकणातील परशुराम भूमीतून धावणार्या रेल्वेचे नाव कोकण रेल्वे आहे. येथील अनेक शेतकर्यांच्या जागा, भूमी या प्रकल्पासाठी गेल्या आहेत, तसेच व्यवसाय, उद्योगही गेले आणि सहस्रो लोकांनी कोकण रेल्वेला सहकार्यही केले आहे. आता कोकण रेल्वेमध्ये भरती होणार आहे. यामध्ये कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी. यासाठी परप्रांतीयांची निवड होता कामा नये, अशी चेतावणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिले आहे.
कोकण रेल्वे प्रशिक्षणासाठीच्या इच्छुक असणार्या बेरोजगारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत नोकरसाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. महिला, अल्पसंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांनी विनामूल्य अर्ज करायचे आहेत. कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज करणार्या उमदेवाराचे वय हे किमान १८ ते कमाल २५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादित सवलत दिली जाईल. कोकण रेल्वेने भरतीची प्रक्रिया ही ‘ऑनलाईन’ पद्धतीने केली असून यामध्ये सिव्हील इंजिनीयर ३०, इलेक्ट्रिकल इंजिनीयर २०, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर १०, मेकॅनिकल इंजिनीयर २०, डिप्लोमा सिव्हिल ३०, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स – १०, डिप्लोमा इलेक्ट्रिकल- २०, डिप्लोमा मेकॅनिकल २० सामान्य पदवीधर ३० पदे अशा पद्धतीने भरती होणार आहे, तरी कोकणाच्या बाहेरील उमेदवाराची निवड होता कामा नये, अशी चेतावणी शौकत मुकादम यांनी दिली आहे