सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण मत्स्यविभागाच्या आश्वासनानंतर स्थगित

साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर बेमुदत उपोषण स्थगित

मालवण : अवैधरित्या मासेमारी करणार्‍या यांत्रिक नौकाधारकांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी येथील पारंपरिक मासेमारांनी १६ नोव्हेंबरपासून चालू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या आश्वासनांनतर १८ नोव्हेंबरला स्थगित केले आहे.

अनधिकृत पर्ससीन नौकांवर मत्स्यविभाग कारवाई करत नसल्याने मालवणचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांना निलंबित करण्यात यावे; बंदरामध्ये ये-जा करणार्‍या नौकांची नोंदणी ठेवण्यासाठी नेमलेले काही सुरक्षारक्षक पर्ससीन मासेमारी करणार्‍यांशी संगनमत करतात, त्यांना कामावरून काढून टाकण्यात यावे, बंदरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तळाशील येथे पारंपरिक मासेमार आणि पर्ससीन मासेमार यांच्यात जो वाद झाला, या वादात ज्या पर्ससीन नौका सहभागी होत्या त्यांच्या कागदपत्राची तपासणी करून कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. उपोषणाच्या कालावधीत काही मासेमारांची प्रकृती खालावली होती; परंतु त्यांनी उपचार करून घेण्यात नकार दिला होता, तसेच मासेमारी विक्री बंद करण्याचा निर्णयही घेतला होता.

‘राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त लवकरच मालवण येथील मत्स्यविभागाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. पारंपरिक मासेमारांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल’, असे  लेखी आश्वासन साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या वतीने १८ नोव्हेंबर या दिवशी उपोषणकर्त्यांना देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.