पुणे – महापालिकेशी संबंधित सर्व न्यायालयीन दाव्यांची स्थिती दर्शवणारा एकत्रित अहवाल प्रत्येक मासाच्या पाच तारखेपूर्वी सादर करावा, असा आदेश तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिला होता; मात्र गेल्या ९ वर्षांत विधी विभागाने एकही अहवाल सादर केला नसल्याने आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून विधी विभाग प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी विधी विभागाने किती अहवाल दिले ? याची माहिती मागितली होती; मात्र अहवाल न दिल्याचे लक्षात आल्यावर वेलणकर यांनी आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे फेब्रुवारी मासात तक्रार प्रविष्ट केली होती. ‘अहवाल न दिल्याने विधी विभागप्रमुखांना आयुक्तांपर्यंत वस्तूस्थिती पोचू द्यायची नसल्याने ते जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे विधी विभागप्रमुखांना निलंबित करावे’, अशी मागणी वेलणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.