54th IFFI 2023 : चित्रपट नगरीसाठी गोवा मनोरंजन संस्था भूमी ‘लिज’वर घेणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

(‘लिज’ म्हणजे भूमी ठराविक कालावधीसाठी भाडेपट्टीवर घेणे)

५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(आंचिम)चे सहअध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला

पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) : गोव्यात चित्रपट नगरी उभारण्यासाठी कोमुनिदादची भूमी उपलब्ध आहे. गोवा मनोरंजन संस्था ‘लिज’वरही भूमी घेऊ शकते. गोव्यात ‘कन्व्हेंशन सेंटर’ही उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आंचिम) होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. पत्रकार परिषदेला गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा या महोत्सवात १९८ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. गोव्यात गेली २० वर्षे ‘आंचिम’ होत आहे; पण गोव्यात अजूनही चित्रपटांशी निगडित मोठे प्रकल्प आलेले नाहीत. यासाठी गोव्यात चित्रपट नगरी उभारण्याचा निर्णय झालेला आहे. चित्रपट नगरीसाठी लवकरच भूमी निवडली जाणार आहे. चित्रपट नगरी उभारल्याने गोमंतकियांना रोजगार उपलब्ध होईल, तसेच गोमंतकीय चित्रपटांना चांगला वाव मिळेल.’’

‘आंचिम’मध्ये ७ गोमंतकीय चित्रपटांची निवड

‘आंचिम’चा उद्घाटन सोहळा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. नागरिकांनी गोवा मनोरंजन संस्थेकडून प्रवेश ‘पास’ घेऊन सोहळ्याचा आनंद घ्यावा. राज्यातील विकलांगांनाही ‘आंचिम’मध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यंदा ‘आंचिम’मध्ये २० गोमंतकीय चित्रपटांच्या प्रवेशिका सादर करण्यात आल्या आहेत. यातील ७ चित्रपटांची निवड झालेली आहे. यामुळे गोव्याचा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. ही गोमंतकियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘आंचिम’च्या निमित्ताने मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यंदा मिरामार आणि हणजूण समुद्रकिनारा, तसेच मडगाव येथील रवींद्र भवन येथे खुले प्रक्षेपण असणार आहे.


हे ही वाचा –

♦ 54th IFFI 2023 : मायकेल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !
https://sanatanprabhat.org/marathi/735444.html