सध्या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्यां’ची आतषबाजी करण्यात यावी’, असे सुचवणारे लिखाण प्रसिद्ध होतांना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आवाज आणि न्यून प्रदूषण करणार्या ‘हरित’ फटाक्यांना संमती दिली आहे. ‘हरित’ फटाक्यांमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला धोका होणार नाही किंवा अल्प प्रमाणात होईल. हरित फटाक्यांमध्ये अॅल्युमिनिअम, पोटॅशियम नायट्रेट किंवा कार्बन हे घातक घटक नसतात. ‘इतर फटाक्यांच्या तुलनेत ‘हरित’ फटाके ३० टक्क्यांपर्यंत अल्प प्रमाणात विषारी घटक उत्सर्जित करतात’, असेही सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय ? तर नव्याने होणारे वायूप्रदूषण थोडे अल्प परिणामकारक असेल; पण असेल हे निश्चित. फटाके म्हटले की, धूर हा होणारच. साधी काडी पेटवली, तरी धूर होतोच. वाढत्या वायूप्रदूषणाच्या समस्येने बहुतेक सर्वच महानगरे आणि विकसित शहरे ग्रासली आहेत. अल्प प्रमाणात निर्माण होणारा धूरही जनतेच्या आरोग्यविषयक अडचणींमध्ये वाढ करणारा ठरेल. दिवाळीनंतर फटाक्यांमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असतांना खरंच फटाके उडवून आणि आतषबाजी करून दिवाळी साजरी करणे आवश्यक आहे का ? याचा विचार सुज्ञ अन् सुजाण नागरिकांनी करण्याची हीच वेळ आहे !
दिवाळी ही आनंदाची पर्वणी आहे. दिवाळीचा आनंद मिळवण्यासाठी सर्व कुटुंबाने एकत्रितपणे साजरा करायचा हा सण आहे. फटाके उडवले नाहीत, तर दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही, असे नव्हे. प्रतिवर्षी दिवाळीत कोट्यवधी रुपयांचे फटाके, दारूगोळा उडवला जातो. प्रदूषण वाढवण्यात सर्वार्ंत मोठा वाटा असणार्या फटाक्यांना दूरच ठेवायला हवे. दिवाळीत फटाके उडवून कुटुंबाच्या स्वास्थ्याशी खेळ करायचा कि फटाकेविरहित दिवाळी साजरी करून निखळ आनंद मिळवायचा ? हे आता ठरवायला हवे. ‘हरित फटाके फोडण्यास अनुमती द्यावी’, असे म्हणणे, म्हणजे पळवाट शोधून काढणे आहे. वायूप्रदूषणाच्या समस्येशी दोन हात करायचे असतील, तर त्या फटाक्यांचा सहभाग नसणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, योग्य गोष्टींचे आचरण हेच आपल्या उद्याच्या पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवणार आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.