Diwali 2023 Lakshmi Pujan : श्री लक्ष्मीदेवी कुणाच्‍या घरी वास करते ?

श्री लक्ष्मी

एक दिवस धर्मराज युधिष्‍ठिराने पितामह भीष्‍मांना विचारले, ‘‘पितामह ! काय केल्‍यामुळे मनुष्‍य दुःखरहित होऊ शकतो ? कोणत्‍या उपायांनी हे समजू शकेल की, एखादा मनुष्‍य दुःखी होणार आहे किंवा सुखी होणार आहे ? कसे समजेल की,  कुणाचे भविष्‍य उज्‍ज्‍वल होईल आणि कुणाचे पतन होईल ?’’ पितामह भीष्‍माने म्‍हटले, ‘‘पुत्र या विषयावर एक प्राचीन कथा तुला सांगतो.’’

एकदा इंद्र आणि वरुण एका नदीजवळून चालले होते. ते सूर्याच्‍या प्रथम किरणापूर्वीच नदीच्‍या तटावर पोचले आणि त्‍यांनी पाहिले की, देेवर्षि नारदसुद्धा तेथे आले आहेत. देवर्षि नारदांनी नदीत स्नान केले आणि मौनपूर्वक जप करत सूर्यनारायणाला अर्घ्‍य दिले. एवढ्यात  सूर्यनारायणाची कोमल किरणे धरतीवर पडू लागली आणि एका कमळावर दैदिप्‍यमान प्रकाश पसरला गेला. इंद्र आणि नारद यांनी त्‍या प्रकाशपुंजाकडे बारकाईने पाहिले, तर त्‍यामध्‍ये माता लक्ष्मी प्रगट झाली होती. दोघांनी माता लक्ष्मीला विनम्रतेने अभिवादन केले. देवी लक्ष्मीला विचारले, ‘‘माता ! समुद्रमंथनानंतर आपण प्रगट झाला होतात. लोक सर्वत्र तुम्‍हाला पूजतात. हे मातेश्‍वरी ! आपणच सांगावे की, आपण कुणावर प्रसन्‍न होता ? आपण कुणाच्‍या घरी स्‍थिर रहाता ? आणि कुणाच्‍या घरातून आपण निघून जाता ? आपल्‍या संपदेने कुणाला मोहित करून संसारात भटकवता ? आणि कुणाला खरी संपदा भगवान नारायणाशी भेटवता ?’’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देवी लक्ष्मीने म्‍हटले, ‘‘देवर्षि नारद आणि देवेंद्र ! तुम्‍ही दोघांनी लोकांच्‍या कल्‍याणासाठी, मानव-समाजाच्‍या हितासाठी हे प्रश्‍न विचारले आहेत; म्‍हणून ऐका. प्रथम मी दैत्‍यांजवळ रहात होते; कारण ते पुरुषार्थी होते, सत्‍य बोलत होते, वचनाचे पक्‍के होते, म्‍हणजे एकदा बोललेले वचन मागे घेत नव्‍हते. कर्तव्‍यपालनात दृढ होते. अतिथींचा सत्‍कार करत होते. सज्‍जनांचा आदर करत होते आणि दुष्‍टांशी युद्ध करत होते. जेव्‍हा त्‍यांचे सद़्‍गुण दुर्गुणांमध्‍ये पालटू लागले, तेव्‍हापासून मी तुमच्‍याजवळ देवलोकात येऊ लागले.

समजदार लोक उद्योग करून मला प्राप्‍त करतात. दान करून माझा विस्‍तार करतात. संयमाने मला स्‍थिर बनवतात आणि सत्‍कर्म करण्‍यात माझा उपयोग करून भगवद़्‍प्राप्‍तीसाठी प्रयत्न करतात. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणारे, सत्‍य बोलणारेे, आपल्‍या वचनावर दृढ रहाणारे, पुरुषार्थी, कर्तव्‍यपालनात दृढता ठेवणारे, अकारण कोणालाही दंड न देणारेे, जेथे उद्योग, साहस, धैर्य आणि बुद्धीचा विकास होतो आणि भगवद़्‍प्राप्‍तीसाठी प्रयत्न होतात, तेथे मी निवास करते. सरळ स्‍वभावाचे, सुदृढ भक्‍ती करणारेे, मृदुभाषी, विनम्रता, विवेक, तत्‍परता हे सद़्‍गुण ज्‍या घरातील व्‍यक्‍तींमध्‍ये आहेत, तेथे मी निवास करते.

जो सकाळी केर काढून घर स्‍वच्‍छ ठेवतो, जो देवभक्‍त, सत्‍य बोलणारा, ईश्‍वराला आवडेल असे आचरण करणारा आणि ज्‍याच्‍या प्रत्‍येक कृतीने इतरांना आनंद मिळत असेल, अशा लोकांच्‍या घरीच देवीला रहाणे आवडते. जे मला स्‍थिर ठेवू इच्‍छितात, त्‍यांनी कधीही रात्री घर झाडून काढू नये. जो अहंकाररहित आहे, त्‍याच्‍यावर मी प्रसन्‍न होऊन त्‍याच्‍या जीवनात भाग्‍यलक्ष्मी, सुखदलक्ष्मी, करुणालक्ष्मी आणि औदार्यलक्ष्मीच्‍या रूपात विराजमान होते.

ज्‍या घरात चारित्रिक, कर्तव्‍यदक्ष, संयमी, धर्मनिष्‍ठ, देवभक्‍त आणि क्षमाशील पुरुष अन् गुणवती आणि पतीव्रता स्‍त्रिया निवास करतात, अशा घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. आजच्‍या स्‍थितीमध्‍ये आपण काय पहातो ? प्रत्‍येक क्षेत्रात भ्रष्‍टाचार चालला आहे, हातावरील बोटांवर मोजता येतील, तेवढ्याही कर्तव्‍यदक्ष व्‍यक्‍ती एकाही कार्यालयात दिसून येत नाहीत. धर्मपालन न केल्‍यामुळे सर्वत्र अनाचार, अनैतिकता वाढली आहे. अशा स्‍थितीत देवी लक्ष्मी त्‍या घरात वास करायला येईल का ? धर्मानुसार पालन करणे, ईश्‍वराची भक्‍ती करणे, धर्म आणि राष्‍ट्र यांच्‍याप्रती जागरूक राहून दक्षतेने कर्तव्‍य करणे इत्‍यादी केल्‍यामुळेच देवी लक्ष्मीची कृपा होऊन ती घरात वास करायला येईल.

– (सद़्‍गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.