सामान्यतः अमावास्येला अशुभ मानले जाते; परंतु दिवाळीच्या काळातील अमावास्या ही शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेसमानच कल्याणकारी आणि समृद्धीदर्शक असते. या दिवशी श्री लक्ष्मीपूजन आणि अलक्ष्मी नि:सारण इत्यादी धार्मिक विधी केले जातात.
दिवाळीच्या या दिवशी धन-संपत्तीची अधिष्ठात्रीदेवी श्री महालक्ष्मीचे पूजन करण्याचा नियम आहे. दिवाळीच्या अमावास्येला मध्यरात्रीच्या वेळी श्री लक्ष्मीदेवीचे आगमन सद़्गृहस्थांच्या घरी होते. घराला स्वच्छ, शुद्ध आणि सुशोभित करून दिवाळी साजरी केल्यामुळे श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न होते. तेथे कायमस्वरूपी निवास करते. या दिवशी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन करतात आणि दिवे लावतात. श्री लक्ष्मीपूजनाचा विधी सपत्नीक केला जातो. लक्ष्मी ही धनाची देवता आहे, तर कुबेर संपत्तीचा कोषाध्यक्ष आहे. या दिवशी त्यांची पूजा केली जाते.
लक्ष्मीदेवी कुठे वास करते ?
पुराणात म्हटले गेले आहे की, कार्तिक अमावस्येच्या रात्री लक्ष्मीदेवी सर्वत्र संचार करत असते. आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधत असते. जेथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता दिसून येते, तेथेच ती आकृष्ट होते. या व्यतिरिक्त ज्या घरात चारित्रिक, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष अन् गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया निवास करतात, अशा घरात लक्ष्मीदेवी वास करते.
अलक्ष्मीचे नि:सारण कसे केले जाते ?
लक्ष्मीदेवीच्या आगमनासाठी अलक्ष्मीचे नि:सारण केले जाते. अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्रता, दैन्य आणि संकट. निःसारणाचा अर्थ आहे बाहेर काढणे होय. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केला जातो. तिला ‘लक्ष्मी’ मानून सायंकाळी तिचे पूजन करतात. तिच्या साहाय्यामुळे घरातील कचरा काढून तो सुपलीत भरतात. हा कचरा म्हणजे अलक्ष्मीचे प्रतीक आहे. तिला बाहेर फेकले जाते. अन्य कोणत्याही दिवशी मध्यरात्री कचरा काढला जात नाही. कचरा बाहेर फेकल्यानंतर घराच्या कानाकोपर्यात जाऊन सूप म्हणजे झांज वाजवतात.
दिवाळीचा आंतरिक आनंद प्राप्त करण्यासाठी या दिवशी स्वतःमधील अवगुणरूपी अलक्ष्मी दूर करण्याचा निश्चय करून ‘सद़्गुरुरूपी लक्ष्मी प्राप्त व्हावी’, अशी प्रार्थना केली पाहिजे.
लक्ष्मीमातेला करावयाची वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना !
लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभर जमाखर्चाच्या हिशेबाची लेखाची वही श्रीलक्ष्मीसमोर ठेवावी. देवीला प्रार्थना करावी, ‘हे लक्ष्मीमाते, आपल्या आशीर्वादाने प्राप्त धनाचा उपयोग आम्ही सत्कार्य आणि ईश्वरी कार्य यांसाठी केला आहे. त्याचा हिशेब समोर ठेवला आहे. आपण आपली संमती द्यावी. पुढील वर्षीही आमचे कार्य व्यवस्थित निभावले जावे.
माझ्या पालन-पोषणासाठी मला चैतन्य देणारेे, माझ्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन भगवान माझ्यात वास करून कार्य करतात. तेही माझ्या धनाचे भागीदार आहेत. मी वर्षभर कोणत्या गोष्टींचा उपयोग केला, त्या पै न् पैचा हिशेब जमाखर्चाच्या वहीत लिहिला आहे. तपासणीसाठी आज ते आपल्या समक्ष ठेवले आहे. मी आपल्यापासून काहीच लपवू शकत नाही. हे लक्ष्मीदेवी, आपण निष्कलंक आणि स्वच्छ आहे. यासाठी मी आपला उपयोग वाईट कार्यासाठी कधी केला नाही. हे श्री सरस्वतीदेवीच्या साहाय्यामुळेच शक्य झाले आहे. तिने माझा विवेक कधीच ढळू दिला नाही. त्यामुळे माझे आत्मबळ अल्प पडले नाही. मला आणि माझ्या परिवाराला सुख-समाधानाचा लाभ झाला.
अमुक इतका व्यय मी प्रभुस्मरण करतच केला आहे. स्मरणाद्वारे त्यांना सहभागी केल्याने त्यांचे साहाय्य प्राप्त झाले. ‘जर मी आपला विनियोग योग्य प्रकारे करू शकलो नाही, तर आपण माझा हात सोडून द्याल’, याची मला सदैव जाणीव असते. त्यामुळे हे लक्ष्मीदेवी, माझ्या धनव्ययासाठी भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपणच त्यांच्याकडे मागणे मागावे. आपल्या शिफारसीविना ते ऐकणार नाहीत. आपण माझ्यावर कृपा करा अन् माझ्या हातून जन्मभर हितकारक विनियोगच होऊ द्या.’
– (सद़्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.