‘बळीराज्य’ आणि त्यासंबंधित कथा !
कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही बलिप्रतिपदेच्या रूपात साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीविष्णूने दैत्यराज बळीला पाताळात पाठवून त्याच्या अतीदानशीलतेमुळे होणार्या सृष्टीची हानी रोखली. बळीराजाच्या अतीउदारतेच्या परिणामामुळे अपात्र लोकांच्या हातात संपत्ती गेली आणि सर्वत्र त्राहि-त्राहि माजली. तेव्हा वामन अवतार घेऊन भगवान श्रीविष्णूने बळीराजाकडे ३ पावले भूमीचे दान मागितले. त्यानंतर वामनदेवाने विराट रूप धारण करून दोन पावलांतच संपूर्ण पृथ्वी आणि अंतरीक्ष व्यापले. तिसरा पाय ठेवण्यासाठी बळीराजाने त्यांच्यापुढे आपले मस्तक केले. वामनदेवाने बळीला पाताळात पाठवतांना वरदान मागायला सांगितले. बळीने वर्षातील तीन दिवस पृथ्वीवर बळीराज्य होण्याचे वरदान मागितले. ते तीन दिवस आहेत नरकचतुर्दशी, दिवाळीची अमावास्या आणि बलिप्रतिपदा. तेव्हापासून या दिवसांना ‘बळीराज्य’ म्हटले जाते.
धर्मशास्त्र म्हणते की, बळीराज्यात धर्मशास्त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्हणजे मद्यसेवन) आणि अगम्यागमन (वेश्यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.
बलीप्रतिपदा कशी साजरी करावी ?
बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीद्वारे बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थबली दीप आणि वस्त्र यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यानंतर स्त्रिया आपल्या यजमानाचे औक्षण करतात. दुपारी मिष्टान्नयुक्त भोजन बनवून ब्राह्मणभोजनही केले जाते. या पूजेचा उद्देश आहे की, बळीराजाने वर्षभर आपल्या शक्तीने पृथ्वीवरील जिवांना त्रास देऊ नये आणि अन्य अनिष्ट शक्तींना शांत ठेवावे. या दिवशी लोक नवीन वस्त्रे धारण करून संपूर्ण दिवस आनंदाने व्यतीत करतात.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
बळीच्या उदाहरणातून बोध घ्या !
बळीला देवत्व प्राप्त झाले !
बळीने राक्षसकुळात जन्म घेऊनही आपल्या पुण्यकर्मांमुळे वामनदेवाची कृपा प्राप्त केली. त्याने ईश्वरी कार्याच्या रूपात जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानशूर राजा होता. या उदाहरणावरून स्पष्ट होते की, प्रत्येक मनुष्य आरंभी अज्ञानामुळे वार्ईट कर्मे करतो; परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांमुळे तो देवत्व प्राप्त करू शकतो. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूचे भयच रहात नाही. यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू बनतो.
बळीराजाप्रमाणे सर्वस्व अर्पण करा !
भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की, भगवंत सर्वस्व अर्पण करणार्याचा दास होण्यासही स्वतः तत्पर असतो. वास्तविक बळी हा असुर होता, तरीही त्याच्या उदारतेमुळे आणि त्याने भगवंताच्या शरणी सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाचा कायापालट केला आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेल्या असुर वृत्तीसाठी पोषक भोगमय विचारांना मिटवून त्या ठिकाणी त्यागाची भावना जोपासून जनतेला दैवी विचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था