३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेची आज होणार भव्य सांगता !

पणजी, ८ नोव्हेंबर (वार्ता.) : ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेची ९ नोव्हेंबर या दिवशी सांगता होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात स्पर्धेचा भव्य समारोप सोहळा होणार आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाणार आहे. समारोप सोहळ्याच्या निमित्ताने मैदान परिसरात कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

समारोप सोहळ्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयापासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानापर्यंत रस्त्याच्या बाजूची दुकाने सुरक्षेच्या कारणावरून एका दिवसासाठी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सोहळ्याविषयी अधिक माहिती देतांना क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘समारोप सोहळ्याला ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २.३० वाजता प्रारंभ होणार आहे. प्रारंभी सोनिया सिरसाट या त्यांची कला प्रस्तूत करतील. दुपारी ३.४५ वाजता उपराष्ट्रपतींचे मैदानात आगमन होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रम संपेल. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील उत्कृष्ट पुरुष आणि उत्कृष्ट महिला खेळाडू, सर्वाधिक पदके प्राप्त केलेला खेळाडू यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.’’

गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह (आय.पी.एस्.) यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने मैदानाची पहाणी केली आणि अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या.

गोव्याला एकाच दिवशी १२ सुवर्ण पदकांसह एकूण २९ पदके

एकूण पदकसंख्या ८०

पणजी : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोपाला २ दिवस शिल्लक असतांना ८ नोव्हेंबर या दिवशी गोव्याने १२ सुवर्ण पदके, ११ रौप्य आणि ६ कांस्य पदके मिळून एकूण २९ पदके प्राप्त केली. यामुळे गोव्याची पदकसंख्या आता ८० (२४ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३३ कांस्य पदके) झालेली आहे. यामुळे गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १० व्या क्रमांकावर पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याने मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग), नौकानयन ‘यॉटिंग’ आणि स्क्वे मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदके प्राप्त केली. पेडे, म्हापसा येथील मैदानात गोव्याने बॉक्सिंगमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदके प्राप्त केली. महिलांमध्ये साक्षी चौधरी आणि पुरुष गटात रजत आणि गौरव चौहान हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले. दोनापावला येथील हवाई समुद्रकिनार्‍यावर खराब हवामानामुळे एकही शर्यत झाली नाही; मात्र मंगळवारपर्यंतच्या एकंदरीत कामगिरीच्या आधारे ‘आयक्यू फाईल’ क्रीडा प्रकारामध्ये गोव्याच्या कात्या आणि डेन कुएल्हो या भावंडांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकले. फातोर्डा येथे ‘स्क्वे मार्शल आर्ट’मध्ये गोव्याने पहिल्या सत्रात ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदके मिळवली.