कोल्हापूर – समाजातील पारंपरिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी देणारी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना असल्याचे प्रतिपादन ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रा. अनिल सोले यांनी केले. ते येथील भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत शाहू स्मारक हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेत बोलत होते. या वेळी मिरज येथील पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पश्चिम महाराष्ट्र संयोजक सुदर्शन पाटसकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी प्रा. अनिल सोले यांनी नोंदणी कशी करावी ?, तसेच योजनेविषयी विस्तृत माहिती देऊन ही योजना १२ बलुतेदार समाजातील पारंपरिक कारागिरांना सन्मान देणारी योजना आहे असेही सांगितले. विश्वकर्मा प्रमाणपत्र, प्रशिक्षण, पहिला टप्पा १ लाख रुपये आणि दुसरा टप्पा २ लाख रुपयांचे कर्ज ५ टक्के दराने मिळणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी योजनेविषयी मनोगत व्यक्त केले आणि उपस्थित लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमात सूत्रसंचालन आनंद गुरव यांनी केले, तर आभार सांगली येथील प्रकाश ढंग यांनी मानले.