शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे नवे अध्यक्ष

मुंबई – येथील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर हे या न्यासाचे अध्यक्ष होते. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून सदा सरवणकर यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

सौजन्य झी 24 तास 

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. माहीम आणि दादर येथील पक्षाचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचे काम त्यांनीच केले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले.

गणेशभक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्य करीन ! – आमदार सदा सरवणकर

आमदार सदा सरवणकर

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर विश्‍वास व्यक्त करून सिद्धिविनायकासारख्या पवित्र संस्थेचे दायित्व मला दिले, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेली अनेक वर्षे मंदिर परिसरात मी अनेक गणेशभक्तांच्या अडचणी पाहिल्या आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी मी कार्य करीन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार सदा सरवरकर यांनी व्यक्त केली.

सरवणकर पुढे म्हणाले, ‘‘सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हते, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि गेली अनेक वर्षे काम करणार्‍या शिवेसनेकडे होते. त्याच विचारांनी पूर्वी असलेल्या शिवसेनेकडे हे दायित्व आले आहे. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार, तसेच गणेशभक्तांच्या भावना पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. गटातटाचा विचार न करता भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील ?, याचा प्रयत्न केला जाईल.’’