चंद्रपूर येथे गोवंश तस्करांवर कारवाई; ४ जणांवर गुन्हा नोंद !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चंद्रपूर – जिल्ह्यातील चिंचपल्ली येथे गोवंश तस्कर गोवंशियांची वाहतूक करत आहेत, अशी गोपनीय माहिती येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरून पोलिसांनी कारवाई करत एकूण १४ गोवंशियांची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वसीम रज्जाक कुरेशी (वय २६ वर्षे), शाहबाज रशीद खान (वय २९ वर्षे), संतोष कोरी (वय २८ वर्षे) आणि सोहेल अहमद शेख (वय २० वर्षे) यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

१. जिल्ह्यातील गोवंश तस्करांवर आळा बसावा, यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथक सिद्ध करत गोवंश तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

२. १ नोव्हेंबर या दिवशी खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचपल्ली येथील बस थांब्याजवळ सापळा रचला.

३. १ दुचाकी आणि चारचाकी वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनांतील लोकांनी सांगितले की, मागून काही अंतरावर गोवंशियांची वाहतूक करणारे वाहन येत आहे; मात्र थांबवलेली ही दोन्ही वाहने गस्त घालत असल्याचे स्पष्ट झाले.

४. पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी करत पिकअप वाहन कह्यात घेतले. तेव्हा त्यात  गोवंश निदर्यपणे कोंबलेल्या अवस्थेत होते.

५. पोलिसांनी १४ गोवंशियांची सुटका करत त्यांना ‘प्यार फाउंडेशन दाताला’ येथे पोचवले, तसेच वरील आरोपींना अटक केली.

संपादकीय भूमिका

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?