अकोला येथील आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन !

अकोला, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – अकोला शहरात ‘लालाजी’ नावाने प्रसिद्ध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री तथा अकोला पश्चिम मतदारसंघाचे ६ वेळा आमदार राहिलेले गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबरच्या रात्री वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

अकोल्याच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये सातत्याने पुढाकार घेऊन सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. भाजपच्या अनेक जुन्या निष्ठावान नेत्यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची  ओळख होती. जात-पात न मानणारे हिंदु समाजाचे नेते म्हणूनही त्यांचा लौकिक होता. सनातन संस्थेशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.

अयोध्या येथील तीनही कारसेवेमध्ये सहभागी होणारे, रामजन्मभूमी  आंदोलनात सहभाग असणारे, अकोला शहरातील भव्य रामनवमी शोभायात्रेचे  जनक असणारे रामभक्त म्हणून ते प्रसिद्ध होते. कोरोनाकाळात त्यांनी गोरगरिबांसाठी जागोजागी अन्नछत्र चालू केले, तसेच औषध पुरवठाही केला. अनेकांना आर्थिक साहाय्य केले. ‘गोरगरिबांचे वाली’ म्हणून ते समोर आले. ४ नोव्हेंबर या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.