३० ऑक्टोबरच्या उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक
श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (जि. बेळगाव) – महाराष्ट्र, कर्नाटक यांसह लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस शनिवार, २८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. २८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी कुर्ली मंदिरातून नाथांची पालखी सबीना पालखी मार्गावरून आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिराकडे रवाना होईल. येथे श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) होईल, तसेच रात्री ढोल जागर होईल. २९ ऑक्टोबरला रात्री ढोल जागर आणि श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) होईल.
३० ऑक्टोबरला उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक होईल. ३१ ऑक्टोबरला महानैवेद्य, रात्री ढोल जागर, नाथांची पालखी सबीनासह उत्सव मंदिराची प्रदक्षिणा आणि उत्तररात्री नाथांची दुसरी भाकणूक होईल. १ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता नाथांची घुमटातील भाकणूक, दुपारी ४ वाजता श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) आणि रात्री कुर्ली मंदिरात पालखी पोचल्यावर यात्रेची सांगता होईल.