‘मागील काही वर्षांपासून मला पू. शिवाजी वटकर यांना सेवेच्या निमित्ताने जवळून अनुभवता येत आहे. मला जाणवलेले त्यांचेे गुण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. पू. शिवाजी वटकर करत असलेल्या लिखाणातून त्यांची वैचारिक प्रगल्भता, लेखनकौशल्य आणि भाव यांचे दर्शन घडणे
मी संकलनाची सेवा करत असल्यापासून मला अनेक संतांचे लिखाण अभ्यासता आले. पू. वटकरकाका यांनाही मी या माध्यमातून अनुभवत आहे. पू. काका करत असलेल्या लिखाणातून त्यांची प्रकृती, त्यांचा स्वभाव आणि त्यांची साधना यांचा सुरेख संगम दिसून येतो. त्यांची वैचारिक प्रगल्भता, विषयाचा परिपूर्ण अभ्यास आणि विषयाची सुसूत्रपणे मांडणी, तसेच एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे विषयाला अनुसरून श्लोक, संतांच्या ओव्या या सर्वांची गुंफण करून विषय सोपा करून सांगणे, यांतून त्यांचे लेखनकौशल्य दिसून येते.
२. ‘प.पू. डॉक्टर मला घडवत आहेत आणि मी घडत आहे’, असा भाव असलेलेे पू. शिवाजी वटकर !
त्यांचे बोलणेही वरील सूत्रांनुसार आहे. ‘त्यांच्या वागण्या-बोलण्यातून अध्यात्म पाझरते’, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही’, असे मला वाटते. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावि पाऊले ।’ ही उक्ती त्यांच्या संदर्भात सार्थ आहे. ‘ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शिष्य आहेत’, हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सिद्ध होते. ते सतत म्हणतात, ‘‘प.पू. डॉक्टरच मला घडवत आहेत आणि मी घडत आहे.’’
३. अध्यात्म जगत असतांना प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवणे
अध्यात्म जगत असतांना त्यांना प्रत्येक गोष्टीची असलेली जाणीव त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. त्यांची स्वतःत पालट करण्याची तळमळही सतत दिसून येते. पू. काकांचे कुटुंबीय आणि साधक यांच्यावर असलेले प्रेम त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येते.
४. जीवनात घडलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे श्रेय इतरांना देणे आणि सहसाधक अन् संत यांचे निरीक्षण करून, त्यांचे गुणवर्णन करून त्यांचे कौतुक करणे
पू. काका त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे श्रेय इतरांना देतात. ‘सहसाधक आणि संत यांचे निरीक्षण करून त्यांचे गुणवर्णन करून त्यांचे कौतुक करणे’, हेही कौशल्य पू. काकांना आत्मसात आहे. त्यासाठी ते विशेष कष्टही घेतात. त्यासाठी ते काव्य लिहितात किंवा प्रसंगी लेख लिहून ‘शिकायला मिळाले’; म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात.
५. क्षात्रभाव
समष्टीला हानीकारक अशा गोष्टीची ते तत्परतेने नोंद घेतात आणि योग्य मार्गाने त्याविषयी वरिष्ठांना कळवतात. योग्य कृती होईपर्यंत पू. काका पाठपुरावाही करतात. तेव्हा एखादे सूत्र शेवटपर्यंत नेण्यासाठी लागणार्या ‘चिकाटी, निर्भयता, अन्यायाविरुद्धची चीड आणि लढाऊ वृत्ती’ या गुणांचा अनोखा संगम त्यांच्या ठायी पहायला मिळतो.
६. इतिहासाचे जतन करण्याचा व्यासंग
‘सनातन संस्थेच्या इतिहासातील ते एक शिलेदार आहेत’, असे मला वाटते. ते साधनेत आल्यापासून त्यांनी अनेक विषयांची कात्रणे संग्रही ठेवली आहेत. त्यांनी अनेक संतांची हस्ताक्षरे, प.पू. डॉक्टरांचे विविध विषयांवरील लिखाण, छापून आलेल्या लेखांची कात्रणे यांचा विषयवार आणि दिनांकानुसार संग्रह करून ठेवला आहे. त्यांनी या सर्वांची एक प्रत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील संग्रहालयात पाठवून एक प्रत स्वतःकडे ठेवली आहे. त्यांचा इतिहासाचे जतन करण्याचा हा व्यासंग मला फार विलोभनीय वाटतो. त्यांचा हा संग्रह हाताळतांना मला पुष्कळ आनंद मिळतो आणि त्यातून येणारा दैवी गंध त्यांच्या या व्यासंगाला अध्यात्माची जोड असल्याची साक्ष देतो.
७. सतत कृतज्ञताभावात असणे
‘‘मी काही कुणी मोठा नाही’’, असे म्हणत वडिलधार्याप्रमाणे त्यांनी केलेले साहाय्य मला प.पू डॉक्टरांच्या अस्तित्वाची आठवण करून देते. पू. काका सतत कृतज्ञताभावात असल्याने ‘त्यांच्या केवळ अस्तित्वाने, त्यांच्या केवळ जवळ उभे राहिल्याने माझ्यातील कृतज्ञताभाव जागृत होतो’, हे मी अनुभवते.
८. जाणवलेले पालट
मागील काही मासांपासून त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवत आहे. त्यांनी वयोमानानुसार आलेल्या मर्यादा स्वीकारल्या आहेत. ते सतत शरण जाऊन कृतज्ञता व्यक्त करतात. ते सतत वर्तमानात, सेवारत आणि आनंदी असतात.
९. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘प.पू. गुरुमाऊली, आपल्या कृपेने माझ्यासारख्या जिवाला लाभत असलेल्या पू. काकांच्या सत्संगाने मला सतत आपले स्मरण घडते’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘प.पू. गुरुमाऊली, आम्हाला पू. काकांचा हा सत्संग असाच मिळत राहो आणि ते आम्हाला घडवत राहोत, तसेच त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१०.२०२३)