‘परात्पर गुरु डॉ. आठवले दैवी बालसाधकांचे कौतुक करतात आणि त्यांना खाऊ देतात. एकदा माझ्या मनात ‘साक्षात् ईश्वर माझे कौतुक करतो. माझा अहं वाढू नये’, असा विचार आला.
१. साधिकेने ‘अहं वाढू नये’, यासाठी तिच्या चुका सांगण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे
नंतर मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, ‘माझा अहं वाढू नये’, यासाठी तुम्ही मला रागवा. तुम्ही मला माझ्या चुका सांगा. तुम्ही मला रागावलात, तरी चालेल; पण माझा अहं वाढू देऊ नका.’
२. दुसर्याच दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात साधिकेची चूक सांगणे
दुसर्या दिवशी सत्संगात एका साधिकेने परात्पर गुरुदेवांना एक प्रश्न विचारला होता. परात्पर गुरुदेवांनी त्याचे उत्तर मला विचारले. तेव्हा मी ‘मला काय बोलायचे आहे ?’, हे लिहीत होते. त्यामुळे मी साधिकेचे बोलणे ऐकले नाही. मी गुरुदेवांना ‘मला उत्तर ठाऊक नाही’, असे सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘एवढ्या साध्या प्रश्नाचे उत्तर येत नाही आणि संस्कारवर्ग घेता ?’’
२ अ. गुरुदेवांची क्षमायाचना करणे आणि आदल्या दिवशी गुरुदेवांना केलेली प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचली असल्याची प्रचीती येणे : त्या वेळी मला पुष्कळ खंत वाटली. मी सूक्ष्मातून कान पकडून त्यांच्या चरणी क्षमायाचना केली. सत्संगाच्या आदल्या दिवशीच मी गुरुदेवांना ‘गुरुदेव, मला माझी चूक सांगा’, अशी प्रार्थना केली होती. ही प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी मला दुसर्याच दिवशी सत्संगात चूक सांगितली. या प्रसंगात मला परात्पर गुरुदेव रागावले, तरीही ‘त्यातून त्यांनी मला पुष्कळ बोधामृत दिले’, असे मला वाटले.
२ आ. लक्षात आलेली सूत्रे
१. ‘मी सत्संगातील सूत्रे नीट न ऐकता माझीच सूत्रे लिहीत राहिले’, ही गंभीर चूक माझ्या लक्षात आली.
२. मी शिकण्यापासून वंचित राहिले.
३. गुरुदेवांनी ‘मी सत्संग घेते’, हा माझा कर्तेपणा आणि अहंही नष्ट केला.
४. ‘साक्षात् भगवंताने चूक सांगितल्यामुळे माझे अनंत जन्मांचे प्रारब्ध नष्ट झाले’, असे मला जाणवले.
३. या प्रसंगानंतर दुसर्या दिवशी माझा व्यष्टी साधनेचा आढावा झाला. त्यातही सहसाधिका आणि उत्तरदायी साधिका यांनी माझ्या चुका सांगून मला साधनेत साहाय्य केले.
४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष आहे’, याची जाणीव होणे आणि ‘मनातील प्रत्येक विचार देवापर्यंत पोचतो’, याची निश्चिती होणे
मी वरील सर्व प्रसंग परात्पर गुरुदेवांना सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘आता ‘उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून मीच चुका सांगतो’, असाच भाव ठेवणार ना ?’’ त्या वेळी मी त्यांना ‘हो’ असे म्हणाले. यातून ‘देवाचे माझ्याकडे लक्ष आहे’, याची मला जाणीव झाली आणि ‘माझ्या मनातील प्रत्येक विचार देवापर्यंत पोचतो’, याची मला निश्चिती झाली.
५. कृतज्ञता
‘परात्पर गुरुदेव, मी प्रयत्न करण्यात पुष्कळ अल्प पडते, तरीही तुम्ही मला चूक सांगून ती सुधारण्याची संधी देत आहात. तुम्हाला अपेक्षित असे घडण्यासाठी तुम्हीच मला चुका सांगून बोधामृत देत आहात’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (१.८.२०२२)
|