गेहलोतांच्‍या ‘वैभवा’ला ग्रहण !

वैभव गेहलोत

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) चौकशीसाठी उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावले आहे. यावरून गेहलोत यांच्‍यासह काँग्रेसचे सर्व नेते, तसेच विरोधी पक्षांचे नेते यांनी नेहमीप्रमाणे भाजपला लक्ष्य केले आहे. गेहलोत यांनी तर ‘संपूर्ण देशात दहशत पसरवून ठेवली आहे’, असे म्‍हटले आहे. यासह त्‍यांनी ‘ईडी’चा वापर विरोधकांना दाबण्‍यासाठी केला जात असल्‍याचाही आरोप केला. मुळात ‘ईडी’ने यापूर्वीही अनेकदा अनेक भ्रष्‍टाचार्‍यांवर कारवाई केली आहे. यांपैकी अनेक जण सध्‍याच्‍या विरोधी पक्षांशी प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष संबंधित आहेत, हे खरे; पण म्‍हणून ‘ईडी’ची कारवाई खोटी किंवा बनावट, असे म्‍हणता येणार नाही. ‘वैभव ज्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणात अडकले आहेत, ते प्रकरण १२ वर्षांपूर्वीचे असून या प्रकरणात त्‍यांनी वेळोवेळी स्‍पष्‍टीकरण दिले आहे; भाजपने निवडणुकीच्‍या तोंडावर हे सूत्र उकरून काढले आहे’, असे वैभव यांच्‍या वडिलांचे म्‍हणणे आहे. गुन्‍हा कितीही जुना असला, तरी शेवटी तो गुन्‍हा आहे. त्‍यातील दोषींना कठोर शिक्षा व्‍हायला हवी. आतापर्यंत कार्ती चिदंबरम्, मनीष सिसोदिया आदी मोठमोठ्या नेत्‍यांना ‘ईडी’च्‍या नोटिसा आल्‍यावर त्‍यांनीही असाच थयथयाट केला होता; परंतु त्‍याचा उपयोग झाला नाही. वैभव यांच्‍या संदर्भातही फार काही वेगळे होणार नाही आणि गेहलोतांच्‍या ‘वैभवा’लाही ग्रहण लागेल, हे निश्‍चित. मुळात ‘ईडी’ची नोटीस आलेल्‍यांपैकी कुणीही ‘हो, आम्‍ही आमच्‍याकडील संपत्तीचा हिशोब देऊ’, असे कधीही म्‍हणत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘कर नाही त्‍याला डर कशाला ?’, या उक्‍तीप्रमाणे राजकारणी का वागत नाहीत ? पाप कधी ना कधी उघड होतेच, हा नियतीचा नियम आहे, हे राजकारण्‍यांना कुणीतरी सांगायला हवे !