तांदळी (जिल्हा पुणे) येथील सरलष्कर नेताजी पालकर यांचा ऐतिहासिक वाडा दुर्लक्षित !

‘पुरातत्व विभागाने संरक्षण आणि संवर्धन करावे’, अशी ग्रामस्थांची मागणी !

पुणे – शिरूर तालुक्यातील तांदळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरलष्कर नेताजी पालकर यांचा ऐतिहासिक वाडा दुर्लक्षित होत आहे. या ऐतिहासिक वाड्याच्या भिंतींची पडझड झाली असून सर्वत्र काटेरी बाभळी हे वृक्ष वाढलेले दिसत आहेत. ‘या वारशाचे शासनाच्या पुरातत्व विभागाने संरक्षण आणि संवर्धन करावे’, अशी मागणी इतिहासप्रेमी चेतन मचाले, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे आणि तांदळी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ‘नेताजी पालकर यांच्या घराण्यातील वंशज, ग्रामस्थ आणि शासनाच्या समन्वयातून नेताजींचे स्मारक उभारावे’, अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे ‘सरनौबत’ होते. त्यांना ‘प्रतिशिवाजी’ म्हणजे ‘दुसरा शिवाजी’ असेही संबोधले जायचे. त्यांनी अनेक युद्धे लढली आहेत; परंतु काही कारणांनी त्यांना मोगलांमध्ये जावे लागले.

९ वर्षे त्यांनी मुसलमान बनून मोगलांची चाकरी केली; पण स्वराज्यात यायची तीव्र इच्छा असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना योग्य विधी करून पुन्हा हिंदु धर्मामध्ये घेतले होते.

संपादकीय भूमिका :

राज्यात पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे हे उदाहरण आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे, हे पुरातत्व विभागाचे कार्य आहे. प्रत्येक मासाला लाखो रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.