हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारे जिहादला समर्थन !’
मुंबई – सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर महंमद रिझवान याने पाकिस्तानचा विजय ‘गाझा पट्टी’ येथील मुसलमानांना समर्पित केला.
क्रिकेट विश्वचषकामध्ये इस्लामविषयीचा हा प्रचार पाहून खेळामध्ये ‘इस्लामिक जिहाद’चा प्रचार थांबला पाहिजे आणि तिथे फक्त खेळच झाला पाहिजे’, या आशयाची तक्रार मी ‘आयसीसी’ (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आणि ‘बीसीसीआय’ (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याकडे केली आहे. खेळाला खेळ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! ८० कोटी हिंदूंची लोकसंख्या असलेल्या ऋषिमुनींच्या भारतभूमीवर कुणी जिहाद आणि आतंकवाद यांची भाषा करत असेल, तर त्याला प्रत्येक हिंदू कडाडून विरोध करील. यासह आमचा विरोध खेळाच्या धार्मिकीकरणाला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारे जिहादला समर्थन !’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
जिहाद समर्थकांच्या खेळण्यावर बंदी आणा ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
वर्ष १९८२ पासून आता २०२३ पर्यंत पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारताशी क्रिकेट खेळण्याला ‘जिहाद’शी जोडले आहे. यापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तानविरुद्ध खेळतांना आक्रमण, दगडफेक यांना सामोरे जावे लागले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भाग्यनगरमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे दिले जातात, तेव्हा येथील ‘सेक्युलरवाद्यां’ना (निधर्मीवाद्यांना) आनंद होतो; मात्र कर्णावतीमध्ये जेव्हा ‘जय श्रीराम’चा जयघोष होतो, तेव्हा त्यांना दुःख होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू मैदानात नमाज पढत ‘अल्ला-हू-अकबर’चे नारे देतात आणि गाझा पट्टी येथील आतंकवाद्यांचे समर्थन करतात, यांवर ‘आयसीसी’ने कारवाई करत जिहाद समर्थकांच्या खेळण्यावर बंदी आणली पाहिजे.