अर्धे शैक्षणिक वर्ष संपूनही पिंपरी (पुणे) येथील विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत शिष्यवृत्तीची पुस्तके !

पिंपरी (जिल्हा पुणे) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये होते. शिष्यवृत्तीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची भविष्यातील स्पर्धा परीक्षेची सिद्धता असते. या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, ही पालक आणि शिक्षक यांचीही इच्छा असते. प्रतिवर्षी मनपा शाळेतील ५ ते ६ सहस्र विद्यार्थी परीक्षेला बसतात; मात्र पुस्तकांच्या खरेदीसाठी शिक्षण विभागाकडून विलंब होत असल्याने अर्धे शैक्षणिक वर्ष संपले, तरी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत.

‘पुस्तके मिळणार कधी आणि मुले अभ्यास करणार कधी ?’ असा प्रश्न पालक विचारत आहेत. मागील २ ते ३ वर्षांपूर्वी कोरोना काळातही परीक्षेच्या अगदी आठवडाभर आधी पुस्तके मिळाली होती. त्यामुळे शिष्यवृत्ती निकाल ५ ते ६ टक्के इतकाच लागला होता. त्यानंतरही पुस्तके वेळेत न मिळाल्याने प्रतीवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात घसरण होत आहे.

महापालिकेचे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले की, शिक्षण विभागाकडून पुस्तकांची रक्कम भरण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील.

संपादकीय भूमिका 

असा शिक्षण विभाग काय कामाचा ? असा विचार आल्यास चूक ते काय ? पुस्तके वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्‍या हानीचे दायित्व कुणाचे ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !