Diwali 2023 Balipratipada : बलीप्रतिपदा 

कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी गोवर्धन पूजनही केले जाते. श्रीकृष्णाने वृंदावनात याच दिवशी गोवर्धन पर्वताचे पूजन केले होते. गुजराथी लोकांमध्ये या दिवशी अन्नकोट करण्याची प्रथा आहे. अन्नाचे वेगवेगळे ढीग करून ते श्रीकृष्णाला अर्पण केले जातात.

बलीप्रतिप्रदेची कथा अशी – अतिशय पराक्रमी आणि दानशूर अशा बळीराजाने इंद्रपद मिळवण्यासाठी अनेक यज्ञ केले. ‘इंद्रपद बळीराजाला प्राप्त झाले, तर त्याच्यातील असुरवृत्तीचा प्रजेला त्रास होईल’, अशी भीती निर्माण झाली; म्हणून श्रीविष्णूंनी यावर युक्ती करून बटु वामनाचा अवतार धारण केला. बटु वामनाने बळीराजाकडे केवळ तीन पावलांएवढेच भूमीचे दान मागितले. दानशूर अशा बळीराजाने त्वरीत ते दान दिले; परंतु वामनाच्या रूपातील श्रीविष्णूंनी दोन पावलांतच सारे विश्व व्यापून टाकले आणि ‘तिसरे पाऊल कुठे ठेवू ?’, असे विचारले असता बळीने त्याचे मस्तक पुढे केले. वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच बळी पार पाताळात गेला. श्रीविष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले. प्रजेची-देवादिकांची काळजी मिटली आणि इंद्रपद सुरक्षित राहिले. श्रीविष्णु बळीच्या औदार्यावर संतुष्ट झाले आणि ‘हा दिवस बलीप्रतिपदा म्हणून साजरा केला जाईल’, असा वर दिला.

हा दिवस पती-पत्नीच्या प्रेमळ नात्याचा दिवस (पाडवा) म्हणूनही साजरा केला जातो. नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने सर्वांना अभय दिले. त्या आनंदाप्रित्यर्थ सत्यभामा आणि रुक्मिणी यांनी श्रीकृष्णाला ओवाळले अन् भगवंतांनी दोघींना भेट म्हणून भरजरी वस्त्रे आणि अलंकार दिले; म्हणून आजही ‘या दिवशी पत्नी पतीला ओवाळते अन् पती ओवाळणी घालतो’, अशी प्रथा रूढ आहे. कर्तृत्व, आदर, प्रेम आणि कृतज्ञता दिव्याच्या साक्षीने व्यक्त करण्याचा हा दिवस.

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)