Lakshmi Puja  : लक्ष्मी-कुबेर पूजन

आश्विन अमावास्येला ‘लक्ष्मीपूजन’ केले जाते. लक्ष्मीची-धनाची पूजा करण्याचा हा दिवस. आपल्या संस्कृतीत धनसंपत्तीला लक्ष्मी समजून तिला पूजनीय मानले आहे.

ॐ आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।।  – श्रीसूक्त, ऋचा १३

अर्थ : हे अग्निदेवते, तू माझ्या घरी स्वभावाने आर्द्र, कमलपुष्प हातात घेतलेल्या, पुष्टीरूप, पीतवर्ण, कमलपुष्पांची माला धारण करणार्‍या, चंद्राप्रमाणे शुभ्र कांती असलेल्या, स्वर्णमयी श्री लक्ष्मीदेवीचे आवाहन कर.

आर्थिक संकटे दूर होऊन सर्व प्रकारच्या धनधान्यांनी युक्त असे ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी श्री सुक्तातील हा श्लोक पठण करावा. लक्ष्मीदेवीस आवाहन करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी म्हटल्या जाणार्‍या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ‘हे सर्वज्ञ जातवेद अग्निदेवता, क्षीरसागरातून आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेल्या, कमळांनी भरलेल्या जलाशयात गजशुंडानी अभिषेक होणार्‍या, सर्व प्राणिमात्रांमध्ये पूर्णत्वाने भरून राहिलेल्या अशा पुष्टीकारक, पिंगल वर्णाच्या कमलमाला धारण करणार्‍या, चंद्राप्रमाणे आल्हाद देणार्‍या, सुवर्णालंकारांनी शोभायमान झालेल्या प्रकाशस्वरूप अशा श्री लक्ष्मीला माझ्या घरी येऊ दे आणि अखंड वास करू दे. विष्णुपत्नी श्री लक्ष्मी आम्हाला सद्बुद्धी देवो, प्रेरणा देवो आणि आमच्या हातून सत्कर्मे पार पाडून घेवो.’’ लक्ष्मी ही प्रयत्नांच्या ठिकाणी वास करते. जो उद्योगी, निर्भय, कुशल आणि सत्वगुणांनी युक्त आहे. अशांच्या ठायी लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच प्रातःकाली आपल्या तळहातांचे दर्शन घेऊन लक्ष्मीदेवीचे स्मरण करावे.

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम् ॥

अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन घ्यावे.

लक्ष्मीदेवतेची ८ रूपे आहेत. धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी. लक्ष्मीच्या अष्टरूपातील हे सर्व गुण आपण अंगी बाणवावेत आणि सतत कार्यरत राहून लक्ष्मीला प्रसन्न ठेवावे. हा लक्ष्मीपूजनामागील खरा गर्भितार्थ आहे.

अ. कुबेर : कुबेर हा वैवस्वत मन्वंतरातील विश्रवा ऋषींचा मुलगा. ब्रह्मदेवाने याच्या सेवेला यक्ष, राक्षस आणि पुष्पक विमान अन् लंका दिली होती. वृद्धि अन् सिद्धि (ऋद्धि) याच्या शक्ति आहेत. अलका याची राजधानी आहे. हा सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा मालक असल्यामुळे या दिवशी कुबेर पूजनही केले जाते.

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)

अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे !