आपल्या हिंदु संस्कृतीत ज्या गायीला आपण पूज्य देवता मानतो, त्या गायीच्या पूजनाने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात. या दिवशी सवत्स धेनूची म्हणजे गाय आणि तिच्या पाडसाची पूजा केली जाते. सवत्स धेनू हे पृथ्वीचेच एक रूप आहे. वसु म्हणजे पृथ्वी. तिच्या अंगाखांद्यावर आपण बागडतो; म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यातून वात्सल्य, प्रेम आणि जिव्हाळा प्रतीत होतो.
या दिवशी गुरुद्वादशीही साजरी केली जाते. अखिल मानवजातीस ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून उपदेश करणार्या गुरूंच्या स्मरणार्थ वर्षातून गुरुपौर्णिमा, गुरुप्रतिपदा आणि गुरुद्वादशी या ३ तिथी साजर्या केल्या जातात. गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करणे, हेच त्यामागील उद्दिष्ट आहे. गुरुद्वादशीच्या निमित्ताने त्या दिवशी समाप्ती होईल, अशा पद्धतीने गुरुचरित्राचे सप्ताहपारायण करण्याची प्रथा आहे.
वसुबारसेच्या दिवशी आकाशकंदिल लावून त्याची पूजा करून दामोदराय नभसि तुलायां दोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ।।
अर्थ : श्रेष्ठ अशा परमेश्वराला म्हणजेच दामोदराला (नारायणाला) मी हा आकाशातील काठीवर झुलणारा ज्योतीसहित दीप अर्पण करतो. त्या अनंताला माझा नमस्कार असो.असा मंत्र म्हणून नमस्कार करावा. हा आकाशात झेपावणारा आकाशकंदिल देवदिवाळीपर्यंत लावावा.
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)